08 August 2020

News Flash

निष्पाप तरुणाला आधी कोठडी, नंतर ‘सुटका’!

नांदेड रेल्वेस्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात जिल्हा पोलिसांकडून चुकीची पुनरावृत्ती घडली! गंगाखेडच्या १९वर्षीय निष्पाप तरुणाला त्यामुळे हकनाक त्रास सहन करावा लागला.

| August 8, 2015 01:30 am

नांदेड रेल्वेस्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात जिल्हा पोलिसांकडून चुकीची पुनरावृत्ती घडली! गंगाखेडच्या १९वर्षीय निष्पाप तरुणाला त्यामुळे हकनाक त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर खातरजमा न करता तपास करणाऱ्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली.
गेल्या २२ जुलस नांदेडचे रेल्वेस्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी नियंत्रण कक्षाला मिळाली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून आवश्यक त्या उपाययोजना करताना हलगर्जीपणा केल्यामुळे नागपूरच्या एका निष्पाप तरुणाला पोलिसी खाक्याचा अनुभव मिळाला होता. नांदेड पोलिसांची चूक लक्षात आल्यानंतर नागपूर पोलिसांनी त्या तरुणाला सोडून दिले खरे; पण नांदेड पोलिसांची यंत्रणा किती ‘जागरुक’ आहे, हे या निमित्ताने अधोरेखित झाले होते.
त्या घटनेनंतर २९ जुलच्या रात्री अदिलाबाद-तिरुपती रेल्वे व किनवट रेल्वेस्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी एकाने नांदेड येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे केली. या धमकीचा दूरध्वनी स्वीकारणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याने कोणत्या दूरध्वनीवरून धमकी आली, याची योग्य खातरजमा न करता दोन वेगवेगळे नंबर देऊन नियंत्रण कक्षाला माहिती दिली. धमकीचा दूरध्वनी आल्यावर पोलिसांनी आवश्यक उपाययोजना पूर्ण केल्या. कृष्णा एक्सप्रेस व किनवट रेल्वेस्थानकाची तपासणी करताना पोलिसांनी ज्या दोन नंबरवरून दूरध्वनी आला त्याची माहिती घेतली.
या प्रकरणात अनिल पांडुरंग राठोड (१९, मूळपेठ तांडा, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी) याला स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही. डी. दिघोळे व त्यांच्या पथकाने अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आणि आम्ही खऱ्या आरोपीला अटक केली, असे त्यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. पोलीस अधीक्षकांसह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीही खातरजमा न करता स्थागुशाच्या पथकाचे जाहीर कौतुक केले.
वास्तविक, ज्या आरोपीला अटक करण्यात आली, त्याने लाचलुचपत विभागाच्या सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या पोस्टरवरून काही दिवसांपूर्वी दूरध्वनी केला होता. बॉम्बच्या धमकीचा त्याचा काहीही संबंध नाही. असे असताना पोलिसांच्या निष्काळजीपणाचा मात्र त्याला मोठा फटका बसला. दोन दिवस पोलीस कोठडी, त्यानंतर न्यायालयीन कोठडी भोगणाऱ्या अनिल राठोडची जामिनावर सुटका झाली असली, तरी नांदेड पोलिसांच्या हलगर्जीपणाचा फटका एका तरुणाला बसल्याचे मानले जाते. २९ जुल रात्रीची घटना असताना ३० जुलस रात्री गुन्हा दाखल झाला. विशेष म्हणजे गुन्हा दाखल होण्यापूर्वीच अनिल राठोडला सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी अटक करण्यात आली.
या प्रकरणी लाचलुचपत विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याने तक्रार देणे अभिप्रेत असताना नियंत्रण कक्षातील सहायक फौजदाराने तक्रार नोंदवली. गंभीर प्रकरणाचा गांभीर्याने तपास आवश्यक असताना स्थागुशाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतची पाठ थोपटून घेण्यासाठी केलेला उद्योग या तरुणाला चांगलाच महागात पडला. भाग्यनगरचे पोलीस निरीक्षक पालीवाल यांनी, आम्हाला सकृतदर्शनी अनिल राठोडने धमकी दिली असावी, असे वाटत नाही. स्थागुशाच्या अधिकाऱ्यांनी आमच्याकडे आरोपी हजर केला; पण आम्ही या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करीत आहोत, असे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2015 1:30 am

Web Title: first custody to innocent youngster after escape
टॅग Nanded
Next Stories
1 ‘बीडमध्ये चारा छावण्या सुरू करा’
2 तुळजापूरमध्ये कृत्रिम पाऊस बरसला, लातूरमध्ये अपयश
3 कार नदीत उलटून चौघे बुडाले
Just Now!
X