उत्तर महाराष्ट्रात करोनामुळे जळगाव येथे पहिला मृत्यू झाला. गुरूवारी दुपारी उपचारादरम्यान या रूग्णाचा मृत्यू झाला. नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या चारही जिल्ह्यात ८२ संशयित रुग्णांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. यामध्ये सर्वाधिक ४५ अहवाल नाशिकचे आहेत. दुसरीकडे, जळगावमध्ये अजून एक रूग्ण करोनाबाधित आढळून आल्याने उत्तर महाराष्ट्रातील करोनाबाधित रुग्णांची संख्या (मृत्यू झालेल्या रूग्णासह) तीनवर पोहचली आहे.

तीन दिवसांपूर्वी जळगावमधील एका रुग्णाचा अहवाल सकारात्मक आला होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांसह त्याच्या संपर्कात आलेल्या २४ जणांची तपासणी करण्यात आली. त्या सर्वाचे अहवाल नकारात्मक आले. खबरदारी म्हणून त्या सर्वाना १४ दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जळगावच्या मेहरूणनंतर आता सालारनगर भागातील रहिवासी करोनाबाधीत असल्याचे उघड झाले. या भागात दाट लोकवस्ती आहे. संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची माहिती आता यंत्रणा घेत आहे. संबंधितावर जिल्हा रुग्णालयातील स्वतंत्र कक्षात उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, दिल्लीतील तबलिगी जमात परिषदेला जळगावमधून १३ जण गेले होते अशी माहिती मिळाली. पण ते कोणतीही तपासणी न करता परतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत १३ जणांपैकी दोन जण दिल्ली येथे असून ते तेथे नोकरीला आहेत. दोन जण नाशिक येथे तर दोन जण भुसावळ शहरात आहेत. जळगाव शहरातील सात जण असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांचे अहवाल नकारात्मक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

नाशिकमध्ये परदेशातून आणि करोनाबाधीत भागातून आलेल्या एकूण ७७२ जणांची तपासणी करण्यात आली. त्यातील ५१० जणांना त्यांच्या घरी तर सहा जणांचे संस्थात्मक पातळीवर विलगीकरण करण्यात आले. या शिवाय करोनाबाधितांच्या निकट संपर्कात आलेल्या १६ रुग्णांचेही विलगीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत १३८ संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यापैकी ९३ जणांचे नमुने नकारात्मक आले. लासलगाव येथील एका रुग्णाचा अहवाल सकारात्मक आला. त्याचे कुटुंबिय आणि संपर्कात आलेल्यांचे अहवाल नकारात्मक आले. अद्याप ४५ रुग्णांचे नमुने प्राप्त झाले नसल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.

दरम्यान, जळगावमधून आतापर्यंत ७८, धुळे ६५, नंदुरबारमधून ३६ संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यातील जळगावमधील ६७, धुळे ४२ आणि नंदुरबारच्या २६ जणांचे अहवाल नकारात्मक आले. धुळ्यातील १९, जळगावमधील आठ, नंदुरबारमधील १० अहवाल अद्याप प्रलंबित असल्याचे विभागीय महसूल कार्यालयाच्या अहवालात म्हटले आहे.

मास्क न लावल्याने युवकाविरुद्ध गुन्हा

करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना तोंडाला मास्क न लावता पोलीस ठाण्याच्या आवारात विनाकारण रेंगाळणाऱ्या पांडुरंग आव्हाड (२७,रा.डोंगरगाव,निफाड) या संशयिताविरुध्द लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मास्क न वापरल्याबद्दल राज्यात दाखल झालेला बहुदा हा पहिलाच गुन्हा असावा. लासलगाव परिसरातील एकास करोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे उघड झाल्यानंतर आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. टाळेबंदीच्या काळात नागरिकांनी घरात रहावे असे निर्देश देण्यात आले आहेत. असे असतांना पांडुरंग आव्हाड हा मास्क वा तत्सम प्रतिबंधात्मक उपाय न करता पोलीस ठाण्याच्या आवारात फिरतांना मिळून आला. या प्रकरणी पोलीस कर्मचारी हरिभाऊ कोते यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

मनमाडमध्ये औषधालयांसह किराणा दुकानांवर वेळेचे बंधन

मनमाडमध्ये ड्रोन कॅमेऱ्याव्दारे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासह औषध दुकाने आणि किराणा दुकानांना पोलिसांनी वेळेचे बंधन घातले आहे. शुक्रवारपासून मनमाडमधील ही दुकाने आता दररोज फक्त चार तास म्हणजे सकाळी नऊ ते दुपारी एक या वेळेतच उघडी राहतील. पोलीस उपअधिक्षक समीरसिंह साळवे आणि निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या उपस्थितीत पोलीस ठाण्यात आयोजित किराणा आणि औषध दुकानदारांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शहरातील भाजी बाजारही वाल्मिकी स्टेडियम, सिकंदरनगर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रीडांगण या तीन ठिकाणी विभागण्यात आला आहे.