मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने अशक्य अशा अटी घातल्यामुळे अडचण निर्माण झाली असली,तरी जातीयवादी शक्तींशी लढायचे असल्याने आघाडी व्हायला हवी, असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. कराड दक्षिणचे काँग्रेस आमदार विलासराव पाटील-उंडाळकर हे ज्येष्ठ असून, योग्य निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री इच्छुक असलेल्या कराड दक्षिण मतदारसंघाच्या धावत्या दौऱ्यावर आले असता, ते माध्यमांशी बोलत होते.
मुंबईत घडामोडी सुरू असताना, दिल्लीत उमेदवारीबाबत बऱ्याचशा प्रक्रिया पूर्ण झाल्या असून, आज अथवा उद्या पहिली यादी जाहीर होईल. निवडणूक प्रचारार्थ पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या ६ सभा राज्यात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आघाडीबाबत तत्काळ अंतिम निर्णय अपेक्षित असल्याचे सूचवताना दोन पक्षांची इच्छा असेल तरच आघाडी होते असे नमूद करून, २००९ च्या विधानसभा निवडणुकीतील फॉम्र्युला यथायोग्य असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. लोकसभेच्या ३ व विधानसभेच्या २ निवडणुका काँग्रेस मित्रपक्ष आघाडीने एकत्रित लढल्या आहेत. आता विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आघाडीने एकत्रित लढण्यास हरकत नाही. परंतु, अशक्य अशा अटींची पूर्तता शक्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले.