News Flash

प्रतीक्षा संपली! शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; १५ हजार लाभार्थ्यांची नावं

एप्रिल अखेरपर्यंत प्रक्रिया होणार पूर्ण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची यादी प्रसिद्ध करताना.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा केली होती. शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचे सरकारचे प्रयत्न असून, पहिली यादी २४ फेब्रुवारीला जाहीर होणार असल्याची घोषणा केली होती. अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर काही तासात शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफी योजनेबद्दल रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत महत्त्वाची माहिती दिली होती. “महाविकास आघाडीचं सरकार विरोधकांना नाही, तर जनतेसाठी बांधिल आहे. मात्र, सरकार स्थिर झालं आहे. काम करत आहे यामुळे विरोधकांना पोटदुखी होत आहे. महाविकास आघाडीनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याची वचनपूर्ती उद्या होत आहे. शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होईल. तीन महिन्या या योजनेची प्रक्रिया पूर्ण होईल. उद्याची यादी शेवटची नसेल. टप्प्याटप्प्यानं याद्या जाहीर केल्या जातील. सरकारनं केलेल्या नियोजनाप्रमाणे सुरूवातीला प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांचा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. एप्रिल अखेरपर्यंत ही योजना पूर्ण होईल,” असं ठाकरे यांनी सांगितलं होतं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर केली. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर राज्य सरकारकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी जाहीर करताना सरकारनं प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांचा समावेश केलेला असून, पहिल्या यादीत ६८ गावातील १५ हजार ३५८ लाभार्थ्यांची नावं आहेत. राज्य सरकारनं कर्जमाफी योजनेची अमलबजावणी करण्यापूर्वी ३४ लाख ८३ हजार ९०८ खात्यांची माहिती संग्रहित केली होती. कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना तसं प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. जिल्हा पातळीवर कर्जमाफीच्या अमलबजावणीचं काम सुरू झालं असून सरकारनं कर्जमाफीसाठी पुरवणी मागणी सभागृहात पटलावर ठेवली आहे. यावर २७ फेब्रुवारी आणि २ मार्च रोजी चर्चा होणार आहे.

पहिली यादी जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर, परभणी, अमरावती व पुणे जिल्ह्यातील प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या जिल्ह्यांतील दोन पात्र लाभार्थी शेतकऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 2:41 pm

Web Title: first list of farmer loan waiver released by maharashtra government bmh 90
Next Stories
1 …म्हणून वडिलांनी DJ च्या तालावर काढली २२ वर्षीय मुलाची अंत्ययात्रा
2 पाच दिवसांच्या आठवड्याचे नियम जाहीर; सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामकाजाची वेळ वाढली
3 अर्थसंकल्पीय अधिवेशन : सरकारची फसवणुकीची मालिका सुरुच – फडणवीस
Just Now!
X