X

बाप्पा पावले ! सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर उतरलं पहिलं विमान

गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर पहिलं विमान उतरलं आहे

गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर सिंधुदूर्गातील चिपी विमानतळावर पहिलं विमान उतरलं आहे. विमानाने चेन्नईहून आज सकाळी उड्डाण केलं होतं. चेन्नईवरुन उड्डाण केलेलं विमान गोवा एअर क्लीअरन्स मिळाल्यानंतर चिपी विमानतळावर लँड झालं. या १२ आसनी विमानातून गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. चाचणीसाठी हे विमान उतरवण्यात आलं होतं. विमान पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

सिंधुदुर्ग चिपी विमानतळाचा संकल्प सन २००९ मध्ये तत्कालीन पालकमंत्री व मुख्यमंत्री नारायण राणे यांनी सोडला होता. चिपी परुळे येथे २७१ हेक्टर्स जमीन चिपी विमानतळासाठी संपादितदेखील करण्यात आली होती.

रस्ते बांधकाम क्षेत्रातील नावाजलेल्या आय.आर.बी. कंपनीला (आय.आर.बी. सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रा. लि.) बांधा वापरा व हस्तांतरण करा या ९५ वर्षांच्या भाडेतत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यासाठी सन २००९ मध्ये करार करण्यात आला होता. एम.आय.डी.सी.च्या माध्यमातून हाती घेण्यात आलेला हा प्रकल्प त्यावेळी १७५ कोटीचा होता. नंतर ३८० कोटीच्या घरात पोहोचला होता.

पर्यटनदृष्ट्या केंद्रबिंदू

सिंधुदुर्ग चिपी विमानतळ पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा केंद्रबिंदू ठरावा म्हणून गोवा राज्याच्या सातार्डा हद्दीपर्यंत रस्ता रुंदीकरण करून प्रवासी वाहतुकीस योग्य बनवला जात आहे. गोवा राज्यात येणारे पर्यटकांनी चिपी विमानतळाचा फायदा घ्यावा म्हणून शासनाचा प्रयत्न आहे.

First Published on: September 12, 2018 1:16 pm