बीड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी २३ वर्षीय संचालक आदित्य सारडा, तर उपाध्यक्षपदी गोरख धुमाळ यांची शुक्रवारी बिनविरोध निवड झाली. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर केलेल्या महायुतीत सर्वाशी समन्वय ठेवण्याची क्षमता असलेले माजी अध्यक्ष सुभाष सारडा यांच्या मुलाकडे अध्यक्षपद सोपवून बँकेचा कारभार पुन्हा सारडा यांच्याकडे सोपविला.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी १५ मिनिटे खास दूतांकडून नावे कळविल्यानंतर पदासाठी चच्रेत असलेल्या अॅड. सर्जेराव तांदळे यांच्यासह इतर इच्छुकांच्या समर्थकांना पंकजा मुंडे यांच्या राजकीय धक्कातंत्राचा पहिला अनुभव आला. नवीन पदाधिकाऱ्यांसमोर बँकेचा व्यवहार सुरळीत करणे व बँक बंद पडल्याने ठेवी अडकलेल्या छोटय़ा ७ लाख ठेवीदारांना विश्वास देण्याचे मोठे आव्हान आहे.
भाजप नेत्या व पालकमंत्री मुंडे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने मुंडे यांच्या सूचनेनुसार नवीन पदाधिकारी निवड झाली. आमदार आर. टी. देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे व रमेश आडसकर यांच्या उपस्थितीत सर्व संचालकांना नाव सांगितल्यानंतर दुपारी १२ वाजता अध्यक्षपदासाठी आदित्य सारडा, तर उपाध्यक्षपदासाठी धुमाळ यांचेच अर्ज दाखल झाले. निवडणूक निर्णय अधिकारी सूर्यकांत सूर्यवंशी यांनी या दोघांची बिनविरोध निवड जाहीर केली.
पाच वर्षांपूर्वी बँक गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यात असतानाच अंतर्गत राजकारणातून राष्ट्रवादी पुरस्कृत संचालकांनी राजीनामे दिले. बँक बंद पडून प्रशासक नियुक्त झाले. गेल्या ५ मे रोजी झालेल्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व सुरेश धस यांच्याबरोबर युती करून १९ पकी १६ जागा जिंकल्या. बँकेत सर्व नवीन चेहऱ्यांना संधी देऊन विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. बँकेचे कारभारीही नवेच असतील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती.
गोपीनाथ मुंडे यांनीही सारडांना ३ वेळा अध्यक्षपदाची संधी दिली होती. सारडा मूळ काँग्रेसचे. सर्वच पक्षांतील नेत्यांकडे त्यांचा राबता असतो. बँकेतील बेकायदा कर्ज प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याने त्यांना संचालक होता आले नसले, तरी मुलाला संचालक करून बँकेचा कारभार स्वत:कडे ठेवण्यात त्यांनी यश मिळविले. नवीन अध्यक्ष सारडा केवळ २३ वर्षांचे असून संगणकशास्त्राचे पदवीधर आहेत. पहिल्यांदाच संचालक झालेल्या आदित्य यांना थेट अध्यक्षपदाची संधी मिळाली. राज्यातील जिल्हा बँकेचे ते सर्वात तरुण
अध्यक्ष ठरले आहेत. उपाध्यक्ष धुमाळ धारूर तालुक्यातून पहिल्यांदाच निवडून आले.