विकास सहकारी साखर कारखान्यात यापूर्वी आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवडणुका झाल्या. या वेळी मात्र विरोधक निवडणुकीस सज्ज झाल्यामुळे २१ फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानाची जय्यत तयारी सुरू झाली आहे.
कारखान्याचे अध्यक्ष अमित देशमुख यांनी जुन्या सर्व संचालकांना या वेळी नारळ देत पूर्णपणे नव्या चेहऱ्यांना संधी दिली. विशेष म्हणजे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या पत्नी वैशालीताई संचालकपदासाठी प्रथमच निवडणुकीच्या िरगणात आहेत. या निवडणुकीत आमदार अमित देशमुख यांच्यासह विलासराव देशमुख सहकार पॅनेलचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले. संचालक मंडळाच्या २१ पकी २ जागा बिनविरोध झाल्या. त्यामुळे १९ जागांसाठी निवडणूक होणार आहे.
अमित देशमुख, आमदार दिलीपराव देशमुख, माजी आमदार वैजनाथ िशदे, अॅड. त्र्यंबकदास झंवर यांच्यासह सत्ताधारी मंडळी विविध भागांत प्रचार सभा घेत आहेत. विरोधकांकडे १९पकी १६ जागांसाठीच उमेदवार आहेत. सर्वपक्षीय स्वाभिमानी शेतकरी विकास पॅनेल या नावाने सर्व जण निवडणुकीत उतरले आहेत. उद्या (शनिवारी) या पॅनेलच्या प्रचारास प्रारंभ होणार आहे. सत्ताधारी गटाकडे सर्व साधनसामग्री असली, तरी आम्ही सभासदांच्या मदतीने विकास कारखाना ताब्यात घेऊ, अशी भूमिका विरोधकांनी मांडली आहे.
गेल्या १३ हंगामांत विकास कारखान्याने साखर कारखानदारीत प्राप्त केलेले देदीप्यमान काम लोकांसमोर असल्यामुळे ऊस उत्पादकांवर आपला पूर्ण विश्वास असल्याचे सत्ताधारी गटाचे म्हणणे आहे.