28 February 2020

News Flash

परभणीच्या पहिल्या महिला महापौर ठरल्या संगीता वडकर

परभणी महापालिकेच्या महिला महापौर पदाचा मान संगीता राजेंद्र वडकर यांना मिळाला. त्याची बिनविरोध निवड झाली. तर उपमहापौर पदावर काँग्रेसचे भगवान वाघमारे यांची निवड झाली.

| November 6, 2014 01:30 am

परभणी महापालिकेच्या महिला महापौर पदाचा मान संगीता राजेंद्र वडकर यांना मिळाला. त्याची बिनविरोध निवड झाली. तर उपमहापौर पदावर काँग्रेसचे भगवान वाघमारे यांची निवड झाली.
महापालिका स्थापनेनंतरच्या अडीच वर्षांंच्या कालावधीनंतर पुढच्या अडीच वर्षांसाठी महापौर – उपमहापौरपदाची निवड प्रक्रिया बुधवारी पार पडली. काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आल्याने निवड बिनविरोध होईल असे पूर्वीच निश्चित झाले होते. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादीकडून महापौरपदासाठी श्रीमती वडकर तर उपमहापौर पदासाठी काँग्रेसचे वाघमारे यांचेच अर्ज आल्याने केवळ औपचारिक घोषणा बाकी होती. बुधवारी (दि. ५) शहरातील बी. रघुनाथ सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी संभाजी झावरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत निवड जाहीर करण्यात आली. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, पालिका उपायुक्त दीपक पुजारी, रणजित पाटील उपस्थित होते. बठकीला काँग्रेस-राष्ट्रवादीचे सर्व सदस्यही उपस्थित राहिले. निवडीची घोषणा झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरात  नूतन पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र मिरवणुका काढल्या. महापौर-उपमहापौरांचे अभिनंदन करण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख, मावळते महापौर प्रताप देशमुख, स्थायी समितीचे सभापती विजय जामकर, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार,  काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार, सेलूचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, मानवतचे गणेश कुमावत, नगरसेवक डॉ. विवेक नावंदर, अश्विनी वाकोडकर, शाम खोबे, गणेश देशमुख, सुनिल देशमुख, विजया कनले यांच्यासह पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
गेल्या काही वर्षांत परभणी शहराचा विकास खुंटला आहे. शहराचे काही भले व्हावे, यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा निर्णय घेतला. एकत्र येण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीसोबत आलो, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांनी दिली.
शहरात तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याकडे आपला भर राहील, तसेच स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येईल. महिला बचतगटांना येत्या महिनाभरात वस्तू विक्रीसाठी प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. अधिकाधिक बचतगट निर्माण करून महिलांना सक्षम करण्यावर आपला भर राहिल, असे निवडीनंतर महापौर श्रीमती वडकर यांनी सांगितले.
शहरातील नागरिकांच्या महापालिकेकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यासाठी निधीची गरज आहे. परंतु महापालिकेचे उत्पन्न हे अत्यल्प असल्याने विकासकामांसाठी निधी कमी पडतो. त्यामुळे सर्वप्रथम महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे उपमहापौर भगवान वाघमारे यांनी सांगितले.

First Published on November 6, 2014 1:30 am

Web Title: first women mayor for parbhani
टॅग Congress,Parbhani
Next Stories
1 मारहाणीनंतर भांबळेंची मध्यस्थी; गावकऱ्यांची सामंजस्याची भूमिका
2 रस्त्यांसाठी अडीचशे कोटींच्या प्रस्तावाची खासदार खैरेंची सूचना
3 अमरापूरकर यांच्यावर अंत्यसंस्कार
Just Now!
X