सनं २०९-२०२० हे वित्तीय वर्ष तीन महिन्यांनी पुढे ढकलण्यात आलं असून वित्तीय वर्ष ३१ जून २०२० पर्यंत वाढवण्यात आलं आहे, अशा आशयाचा बातम्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. मात्र या वृत्त चुकीचे असून असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळेच महाराष्ट्र सरकारने यासंदर्भात वित्तीय अधिकाऱ्यांसाठी आणि कर्मचाऱ्यांसाठी पत्रक जारी केलं आहे.
काय होतं वृत्त
सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या वृत्तामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आर्थिक वर्ष पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचा दावा करण्यात आला होता. सोमवारी या वृत्ताची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा सुरु होती. मात्र आता यावर मंत्रालयाच्या वित्त विभागाने पत्रक जारी करुन महत्वाचा खुलासा केला आहे.
काय आहे वित्त विभागाचे म्हणणे
वित्त विभागाने जारी केलेल्या पत्रकामध्ये सोशल मिडियावर चर्चे असणारे आर्थिक वर्ष पुढे ढकलण्यात आल्याचे वृत्त चुकीचे असल्याचं म्हटलं आहे. “सन २०१९-२०२० हे वित्तीय वर्ष दिनांक ३१ मार्च २०२० रोजीच संपणार असून ते दिनांक ३० जून २०२० पर्यंत वाढवण्यात आलेले आहे, अशा आशयाच्या बातम्या प्रासर माध्यमाद्वारे प्रसारीत करण्यात येत असून त्या असत्य आहेत. त्यानुसार वित्त विभागातील सर्व सह/उप सचिव यांनी दिनांक २६ व २७ मार्च तसेच दिनांक ३० व ३१ मार्च २०२० रोजी न चुकता कार्यालयामध्ये उपस्थित रहावे. तसेच आपल्या खात्याशी संबंधित अधिकारी अथवा कर्मचारी यांना आवश्यकतेनुसार कार्यालयात हजर राहण्याबाबत सूचना द्याव्यात,” असं वित्त विभागाने जारी केलेल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे. वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोर सौनिक यांनी हे पत्रक जारी केलं आहे.
त्यामुळे मुंबईसहीत संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन असतानाही वित्त विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्यालयात जावे लागण्याची शक्यता आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 24, 2020 5:06 pm