06 July 2020

News Flash

राज्यात मत्स्यबीजांचा प्रचंड तुटवडा

राज्यातील मत्स्यबीज उत्पादन केंद्रांमधून पुरेशा प्रमाणात मत्स्यबीजे उपलब्ध होत नसल्याने त्याचा परिणाम मत्स्यनिर्मितीवर झाला आहे.

| December 20, 2014 01:58 am

राज्यातील मत्स्यबीज उत्पादन केंद्रांमधून पुरेशा प्रमाणात मत्स्यबीजे उपलब्ध होत नसल्याने त्याचा परिणाम मत्स्यनिर्मितीवर झाला आहे. राज्यातील २० मत्स्यबीज उत्पादन केंद्रे बंद अवस्थेत आहेत. ही केंद्रे भाडेपट्टीने चालवण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी घेण्यात आला होता, पण त्यातूनही फारसे काही हाती
लागलेले नाही.
राज्याला सुमारे ७२० किलोमीटरचा समूद्र किनारा लाभला आहे. त्यापैकी १.१२ लाख चौरस किलोमीटरचे क्षेत्र सागरी मासेमारीसाठी योग्य आहे. या व्यतिरिक्त राज्यात ३.०१ लाख हेक्टर क्षेत्र गोडय़ा पाण्यातील आणि १९ हजार हेक्टर क्षेत्र निमखाऱ्या पाण्यातील मासेमारीसाठी उपलब्ध आहे. २०१३-१४ या वर्षांत कृषी आणि संलग्न क्षेत्राच्या स्थूल राज्य उत्पन्नात मत्स्यव्यवसायाचा ०.३ टक्के वाटा होता. राज्याच्या सागरी तटावर मासळी उतरवण्याची १६२ केंद्रे आहेत, अशी माहिती मत्स्यव्यवसाय विभागातील सूत्रांनी दिली. सागरी मासेमारीतून उत्पादन सातत्याने कमी होत असताना गोडय़ा पाण्यातील मासे उत्पादनातही सातत्याने घट होताना दिसत आहे. त्यासाठी मत्स्यबीजांचा तुटवडा कारणीभूत मानला जात आहे. राज्यात ३० मत्स्यबीज उत्पादन केंद्रे असून, त्यांची दरवर्षी सुमारे १२ हजार ३५० लाख बीज उत्पादनाची क्षमता असल्याचे कागदोपत्री नमूद आहे. प्रत्यक्षात २० मत्स्यबीज उत्पादन केंद्रे बंद अवस्थेत असून, त्यातून मत्स्यबीजांचा पुरवठा बंद झाला आहे.
विदर्भातील १३ मत्यबीज केंद्रांपैकी ११ केंद्रे बंद आहेत. विदर्भात गोडय़ा पाण्यातील मासे निर्मितीची क्षमता मोठी आहे. वर्धा, वैनगंगा, पूर्णा या नद्यांमधील पाण्यामुळे मत्स्य उत्पादनाचा पारंपरिक व्यवसाय सुरू आहे. याशिवाय, तलाव आणि शेततळ्यांमधूनही मासे उत्पादन घेतले जाते. राज्यातील अनेक भागात मच्छीमार सहकारी संस्था स्थापन झाल्या, पण या संस्थांचे जाळे आता मोडकळीस आल्याचे चित्र आहे. या क्षेत्रावर खाजगी व्यावसायिकांची नजर गेल्याने आता हळूहळू या क्षेत्राचेही खाजगीकरण होऊ लागले आहे. सहकारी मच्छीमार संस्थांसाठी किचकट नियम आणि अटींचे डोंगर उभे करण्यात आले. सरकारच्या या धोरणाचा प्रतिकूल परिणाम या संस्थांवर झाला आहे.
राज्यात १६ ठिकाणी मत्स्यबीज संवर्धन केंद्रे आहेत. तांत्रिक अडचणी, अपुरा निधी आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे या केंद्रांमधून पूर्ण क्षमतेने मत्स्यबीज उत्पादन घेणे शक्य होत नसल्याने यापैकी ४ केंद्रे ही खाजगी गुंतवणुकीद्वारे भाडेपट्टीवर देण्याचा निर्णय सरकारने काही वर्षांपूर्वी घेतला होता. पण, या मत्स्यबीज उत्पादन केंद्रांच्या दुरुस्तीसाठी लागणारा वेळ आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न हे कराव्या लागणाऱ्या गुंतवणुकीपेक्षा कमी असल्याने त्याला फारसा प्रतिसाद
मिळाला नाही.

समितीची नियुक्ती
अजूनही मत्स्यबीजांचा तुटवडा कायम आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आता पशूसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समितीची नियुक्ती सरकारने केली असून, या समितीने महिन्यात आपला अहवाल सरकारकडे सादर करायचा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2014 1:58 am

Web Title: fish seeds scarcity in maharashtra
Next Stories
1 चंद्रपूर विस्तारित विद्युत प्रकल्पाचा २८ ला प्रारंभ
2 रोकडेश्वर सूतगिरणीला सील, ४०० कामगारांवर कुऱ्हाड
3 वेळ अमावास्येचा ‘उपचार’!
Just Now!
X