हवामान बदलामुळे मासेमारी अत्यल्प; घोळ, रावस, सुरमई, दाढा आवाक्याबाहेर

पालघर: पालघरमध्ये मासळी कमतरता असल्याने त्यांचे दर वाढतच जात आहेत. यामुळे मासे खवय्ये त्याकडे पाठ फिरवत आहेत. या काळात अचानक मासेमारी कमी झाली असल्याने बाजारात मासळीची आवक कमी झाली आहे. त्यामुळे वाढते दर लक्षात घेता नागरिक चिकन व मटण किंवा खाडीतील मासे याकडे वळताना दिसत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून हवामान बदलासह विविध कारणांमुळे मासेमारी अत्यल्प झाली आहे. यामुळे मच्छीमार समाजही हतबल झाला आहे. मात्र उपलब्ध असलेल्या मासळीचे दर सद्य:स्थितीत मासळी बाजारात चांगलेच वधारले असल्यामुळे मासे खाणाऱ्याच्या तोंडचे पाणी पळाले आहे. मासळी बाजारात सद्य:स्थितीत सुप्रसिद्ध पापलेट दिसेनासे झाले आहेत. समुद्रातील कोळंबीने कोळंबी प्रकल्पातील कोळंबीची जागा घेतली आहे. सद्य:स्थितीत बाजारात बोंबीलही दिसेनासे झाले आहेत. जी मासळी बाजारात उपलब्ध होत आहे तिला चांगलाच दर असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मासळी परवडेनाशी झाली आहे. ग्राहक मासळीची तहान चिकन- मटणवर भागवताना दिसत आहे.

सद्य:स्थितीत पालघरच्या बाजारात येत असलेले मासे हे मुंबई उत्तन अशा ठिकाणाहून आणले गेल्यामुळे त्याचा भाव जास्त असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी दहा नग बोंबीलसाठी शंभर रुपये दर होता. तोच आता सहा नगसाठी शंभर रुपये इतका आहे. मध्यमवर्गीय समुद्री कोळंबीचा एक वाटा पन्नास रुपयांना सहजरीत्या मिळत होता. आता हाच वाटा शंभर ते सव्वाशे रुपयांवर पोचला आहे.

पापलेटच्या दरांनी तर उच्चांकच गाठला आहे. हजार रुपयांखाली पापलेट मिळत नसल्यामुळे पापलेटकडे ग्राहकवर्ग पाठ फिरवत आहेत. या काळात मिळणारी चवीची शिंगाळा अंडीचे दर एका भागाला पाचशे ते सातशे रुपये असल्याने ते घेण्यास ग्राहक कचरत आहेत. येथील प्रमुख अन्नात आवर्जून मासळीचा समावेश होतो. मात्र वधारत्या दरामुळे तेही जेवणाच्या ताटातून गायब होणार आहेत. शुक्रवारच्या बाजारात अशाच काही मासळी विकणाऱ्या महिलांनी आपली मासळी न विकल्यामुळे घरी परत नेल्याची घटनाही घडली आहे.

खाडीतील मासे खिशाला परवडणारे

बाजारात करंदी, मांदेली, मुशी, करकरा, बांगडे, काही प्रमाणात बोंबील आदी मासेच दिसत आहेत. याव्यतिरिक्त बाजारात घोळ, रावस, सुरमई, दाढा असे मासे उपलब्ध असले तरी ते प्रतिकिलो हजार रुपयांपेक्षा जास्त दराने मिळत आहेत. त्यामुळे नागरिक खाडीतील पारंपरिक व खिशाला परवडणारे मासे किंवा चिकन-मटण घेताना दिसत आहेत. मासळी बाजारात साधारणत: काही दिवसांपूर्वी शंभर ते दीडशे रुपयांना मिळणारी मासळी आता दोनशे ते अडीचशे रुपयांना मिळत असल्याने ग्राहक मासळी बाजाराकडे पाठ फिरवत असल्यामुळे मच्छीमारांचेही मोठे नुकसान होत आहे.