सांगलीत मगरींना मासेमारीच्या जाळय़ांचा फटका

सांगली :  कृष्णा नदीतील पाणी पातळी घटल्याने मासेमारी जाळ्यांचा फटका आमणापूरकाठी नैसर्गिकअधिवासातील मगरींना बसत आहे. बुधवारी नदीकाठी आलेल्या मगरीच्या पोटाला, तोंडाला जाळे अडकले असल्याचे आढळून आले. मात्र अकरा फुटी मगरीची सुटका करण्यास कोण धजावणार आणि धजावले तर ती तोपर्यंत काठी राहिलच याची खात्री देता येत नसल्याने सध्या ही मगर तोंडात अडकलेल्या जाळीसह नदीत विहार करीत आहे.

कोयनेच्या पाण्याचे आवर्तन लांबल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट झाली आहे.  त्यामुळे  पलुस तालुक्यातील आमणापूर नदीपात्रात कोरडा ठणठणाट आहे. यामुळे एकीकडे पाण्यासाठी शेतकरी हवालदिल झालेले असताना हौशी व व्यावसायिक मच्छीमार मासेमारीसाठी गर्दी करीत आहेत. तर सध्या थंडीचा कडाका असल्याने व मटण महागल्याने नदीतील माशांना मोठी मागणी आहे. पलूस तालुक्यातील आमणापूर याठिकाणी  मगरींचा वावर असल्याने काहिलीने मासेमारी होते. यामध्ये स्थानिकांपेक्षा बाहेरील मच्छीमारांचे प्रमाण वाढले आहे. पाणी पातळी खालावल्याने मासेमारांनी सोडलेल्या जाळ्यांचा फटका येथे नैसर्गिकअधिवासात असणाऱ्या मगरींना बसला आहे.

आमणापूर येथील पीराच्या परिसरात नैसर्गिकअधिवासात मगरी वास्तव्यास आहेत. यातील सुमारे अकरा फूट लांबीच्या मगरीच्या तोंडाला, पोटाला, पाठीत जाळे अडकल्याचे आढळले आहे. नदीकाठी पक्षी निरीक्षणासाठी गेलेल्या संदीप नाझरे, आशीष शेजाळे यांच्या हा  प्रकार  लक्षात आला.