सातत्याने पडणारा मत्स्य दुष्काळ आणि वाढती महागाई यामुळे मेताकुटीस आलेल्या मच्छिमारांवर डिझेलच्या दरवाढीचे आणखी एक संकट कोसळले आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारितील तेल कंपन्यांनी प्रतीलिटर ११ रुपये ६२ पैसे एवढी घसघशीत वाढ केल्याने मच्छिमारांनी दरवाढीच्या निषेधार्थ मासेमारी बंद आंदोलन सुरू केले आहे. गेल्या गुरुवारपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे करोडो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ासह कोकण किनारपट्टीतील बोटी आपापल्या बंदरात उभ्या असल्याने नेहमीच गजबजणाऱ्या या बंदरांमध्ये स्मशान शांतता पसरली आहे. माशांची आवकच थांबल्याने मासळी बाजारात शुकशुकाट पडल्याचे दिसून येते. परिणामी खवय्यांनी आपला मोर्चा  मटण, चिकन आणि भाजीमार्केटकडे वळविला आहे. मात्र त्यांचेही दर गगनाला भिडलेले असल्याने खवय्यांचे हाल होत आहेत.
दरम्यान जोपर्यंत केंद्र सरकार डिझेल दरवाढ मागे घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार असल्याचा निर्धार मच्छिमारांनी केला असल्याचे कोकण लाँच मालक संघाचे हसनमियाँ राजपूरकर, मच्छिमार कृती समितीचे अमजद बोरकर व साखरीनाटे मच्छिमार सोसायटीचे चेअरमन वजूद बेबजी यांनी सांगितले. खासगी उद्योग समूह, महामंडळे आदींना देण्यात येणाऱ्या दरानेच मच्छिमार सहकारी संस्थांनाही डिझेल विकत देण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला. किरकोळ बाजारात डिझेलची किंमत प्रती लिटर ५० पैशांनी तर घाऊक बाजारात प्रतीलिटर ११ रुपये ६५ पैशांनी वाढविण्यात आली. ही दरवाढ अन्यायकारक असल्याने ती केंद्र सरकारने मागे घ्यावी, अशी मागणी करून मच्छिमारांनी गेल्या गुरुवारपासून मासेमारी बंद आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाला हर्णे, दाभोळ, जयगड, रत्नागिरी, मिरकरवाडा, साखरतर, काळबादेवी आदी ठिकाणच्या मच्छिमारांनी १०० टक्के पाठिंबा दिला आहे.   त्यामुळे गेले चार दिवस मासेमारी ठप्प झालेली आहे. करोडो रुपयांची उलाढाल थांबली आहे. शिवाय या व्यवसायावर अवलंबून असलेल्या लहान-मोठय़ा उद्योगांवरही विपरीत परिणाम झाला आहे. मात्र, मासेमारी बंद असली तरी बोटीवरील खलाशी व तांडेल यांचा पगार, भत्ता मात्र द्यावा लागत असून त्याचा खर्च बोटमालकांनाच सहन करावा लागत आहे, अशी माहिती राजपूरकर यांनी दिली. हा खर्च सोसावा लागत असला तरी कोणत्याही परिस्थितीत मासेमारी बंद आंदोलन चालूच ठेवण्याचा निर्धार मच्छिमार बांधवांनी केला असल्याचे त्यांनी सांगितले. कोकण किनाऱ्यावर मासेमारी बंद आंदोलन सुरू झाल्यापासून समुद्रात होणारी इंजिनांची धडधड पूर्णत: बंद झाली असून बंदरातही स्मशान शांतता असल्याचे चित्र दिसून येते. मासेमारी बंदमुळे मासळीबाजार ओस पडले असून, खवय्यांचा मोर्चा मटण, चिकन व भाजी मार्केटकडे वळला आहे. मात्र, मटण, चिकन आणि भाज्यांच्या किंमतीही गगनाला भिडल्याने खवय्यांचे हाल होत आहेत.
डिझेल दरवाढीचा केंद्र शासनाने फेरविचार करून ही अन्यायकारक दरवाढ पूर्णत: मागे घ्यावी यासाठी मच्छिमारांचे एक शिष्टमंडळ दिल्लीला गेले असून तेथे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत संबंधित तेल कंपन्यांचे प्रतिनिधी व अधिकारी यांची बैठक होणार आहे. या बैठकीत ही दरवाढ मागे घेण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. दरवाढ मागे घेण्यात आली नाही तर मासेमारी बंद आंदोलनही मागे घेतले जाणार नाही, असा निर्धार मच्छिमारांनी व्यक्त केला आहे.