News Flash

आमगावची चवदार मत्स्यचकली मुंबईच्या वाटेवर

सेलू तालुक्यातील आमगावच्या मत्स्यसखी मासेपालन केंद्रातील केवळ महिलांचा हा उद्योग गावखेडय़ातील आदर्श ठरावा असा आहे.

महिलांकडून मत्स्यपालनातून स्वयंरोजगाराचा नवा आदर्श

गावपातळीवर स्थिरावलेल्या ‘मत्स्यसखी’ आता आपल्या चवदार ‘मत्स्यचकली’ला मुंबईच्या ‘प्याला’प्रेमींना उपलब्ध करण्यास सज्ज झाल्या आहेत. माशांपासून लोणचे, चकल्या, शेव तयार करण्यास आरंभ केलेल्या जलपरी मासळी उत्पादन केंद्राच्या महिला सदस्यांनी परंपरागत मत्स्य खाद्यपदार्थाखेरीज या चवदार ‘चखणा’ निर्मितीमध्ये कौशल्य प्राप्त केले आहे. लवकरच ते मुंबईतील हॉटेल्स/बारमध्ये उपलब्ध होणार आहेत.

सेलू तालुक्यातील आमगावच्या मत्स्यसखी मासेपालन केंद्रातील केवळ महिलांचा हा उद्योग गावखेडय़ातील आदर्श ठरावा असा आहे. गावात काम नाही. शेतमजुरी पुरत नाही, अशा स्थितीत या महिला राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या संपर्कात आल्या. गावातच शेततळे असल्याने मासेपालनाचा व्यवसाय सुचवण्यात आला. कुटुंबात कधीही मासेमारी न पाहिलेल्या या महिलांनी सुरुवातीला आढेवेढे घेतले, पण पुढे शासकीय सहाय्य मिळत असल्याचे दिसून आल्यावर एकदम ५२ महिला तयार झाल्या. एका हंगामात जवळपास पाचशे किलोचे मत्स्योत्पादन होऊ लागले. प्रत्येकी ४ ते ५ हजार रुपयाची मासोळी विकली जाऊ लागली. मात्र, बचतगटामार्फत विक्री केल्यास दलाली देण्याचे काम पडणार नाही, असे उमगल्यावर जलपरी मासोळी उत्पादन केंद्र सुरू करण्यात आले. सुरुवातीला फोयदा शंभर टक्केच होता.

अचर्ना अंबोरे, अलका लोखंडे, प्रमिला सोलकर, प्रतिभा गौरखेडे, शालूताई पंधराम, वनिता कंगाले, प्रतिभा वाघाडे या सात महिलांची निवड मास्यांपासून खाद्यपदार्थ तयार करण्याच्या प्रशिक्षणासाठी झाली. नागपूरच्या मत्स्यविज्ञान विद्यापीठात त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. हळूहळू हे पदार्थ काही घरात तयार होत गेले. चकल्यांना सुरुवात झाली. मग लोणचेही बनले. शेव ६० रुपये, लोणचे २०० रुपये, चकल्या ७५ रुपये प्रती १०० ते २०० ग्रॅम अशा  भावाने या महिलांनी विक्री सुरू केली. शहरात  भारणाऱ्या विविध प्रदर्शनात या महिलांनी स्टॉल लावले.

या  भागाचे आमदार डॉ. पंकज  भोयर यांनी मुंबईच्या हॉटेल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी हे खाद्यपदार्थ ठोक प्रमाणात विकत घ्यावे म्हणून बोलणी चालवली आहे. ते जुळल्यास या चकल्या, शेवेला मोठी बाजारपेठ मिळेल.

होणार काय? वध्र्याजवळील आमगावची मत्स्यचकली आणि शेव अलीकडच्या काळात नागपुरातील चखणाप्रेमींची आवडती गोष्ट बनली आहे. माशांवर प्रक्रिया करून तयार केलेल्या या पदार्थाना बाजारपेठ ही निव्वळ प्रदर्शनांमधून होत होती. मात्र आता मुंबईच्या हॉटेल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांच्या विक्रीबाबत बोलणी सुरू असून, लवकरच या पदार्थाची चव मुंबईमधील हॉटेल्स आणि बारमध्ये घेता येणार आहे.

आम्ही कधीही माशाच्या वाटय़ाला गेलो नव्हतो. वासही सहन होत नव्हता, पण शेतातच राबून किती कमावणार, मुलांचे शिक्षण कसे करणार, बचत कशी करणार, असे प्रश्न पडायला लागल्याने उपजीविकेचे सोपे साधन म्हणून आम्ही मत्स्यपालनाचा व्यवसाय सुरू केला. तुम्ही चकलीची चव चाखून पाहा. परत परत मागाल आणि डोळय़ांसाठी हे पदार्थआरोग्यदायी आहेत. शिवाय स्वस्त आहेत. आम्ही काही खूप नफो कमावत नाही, पण घरची स्थिती आता सुधारत असल्याने व्यवसायात आनंद वाटतो.

अर्चना अंबोरे, मत्स्यसखी

मासोळीच विकण्यापेक्षा त्यापासून केलेले पदार्थ अधिक उत्पन्न देऊ शकतात, असे आम्ही पटवून दिले. महिलांना रोजगार मिळाला. आता या सात महिला अन्य गावातील महिलांना प्रशिक्षण देत आहे. बाजारपेठ नाही. त्यामुळे महिला स्वत:च लोकांपर्यंत माल घेऊन जातात.

हेमंत काकडे, समन्वयक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2018 3:04 am

Web Title: fishery foods self employment from women by fish farming
Next Stories
1 मुदतठेवीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विमा संरक्षण
2 विधान परिषदेतील फुंडकरांच्या रिक्त जागेवर अरुण अडसड यांना संधी?
3 ‘बीड-उस्मानाबाद-लातूर’चा आज निकाल
Just Now!
X