सोळा खलाशी बचावले

मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेलेल्या मुरबा येथील एका बोटीला मोठय़ा जहाजाची धडक बसल्याचा प्रकार खोल समुद्रात घडला. या अपघातामध्ये महाकाय बोटीने या लहान बोटीला काही अंतर सोबत फरफटत नेले होते. सुदैवाने अपघातामध्ये मासेमारी बोटीवरील सर्व सोळा खलाशी बचावले आहेत.

पालघर तालुक्यातील मुरबे येथील अनिल तरे यांच्यासह स्थानिक मच्छीमारांनी कर्ज काढून मासेमारी बोट उभारली. दोन ऑक्टोबर रोजी ही बोट खोल समुद्रात मासेमारी करत होती. त्यासाठी रात्रीच्या सुमारास ३० नॉटिकल मैल अंतरावर समुद्रात जाळी टाकून बोट नांगरली होती. या दरम्यान बोटीवरील सर्व तीन दिवे लावून मच्छीमार ढोली (जाळी) कविवर लावून झोपी गेले होते. बोटीवरील सर्व खलाशी साखरझोपेत असताना एका महाकाय व्यावसायिक जहाजाने या बोटीला धडक दिली व या मोठय़ा जहाजाने या लहान मासेमारी बोटीला नांगराला सोबत घेऊन काही अंतर सोबत फरफटत नेले.  दरम्यान, पालघर जिल्ह्यात वाढवण व नांदगाव येथे जेटी उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. व्यावसायिक बंदरांची उभारणी झाल्यास आगामी काळात मच्छीमारांसाठी हा अपघात धोक्याची घंटा असल्याची भीती मच्छीमारांकडून व्यक्त केली जात आहे.