सुमारे दोन अडीच महिन्यांच्या बंदी आदेशानंतर १५ ऑगस्टपासून यंदाच्या मासेमारी हंगामाला सुरुवात झालेली असली तरी कोकण किनारपट्टीवर वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने मासेमारीला निसर्गानेच ब्रेक लावला आहे. गेले चार दिवस वादळी वारे वाहत असून पावसाचेही पुनरागमन झाल्याने मच्छीमारांनी आपल्या बोटी बंदरात उभ्या करून ठेवल्या आहेत.
दरम्यान मासेमारीसाठी आपल्या बोटी सज्ज ठेवल्याने दोन-अडीच महिने ओस पडलेली बंदरे खलाशी, बर्फ आदींची वाहतूक करणारी वाहने आणि लहान-मोठय़ा व्यापाऱ्यांच्या गर्दीमुळे गजबजून गेली आहेत. त्यांना जिवंतपणा आल्याचे चित्र पाहावयास मिळते.
१० जून ते १५ ऑगस्ट किंवा नारळीपौर्णिमा या कालावधीत समुद्रात मासेमारी करण्यास कायद्याने बंदी असून, या आदेशाचे कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार बांधव काटेकोरपणे पालन करतात. मात्र गोव्यासह परराज्यातील पर्सनेट ट्रॉलर्स अगदी किनाऱ्यालगत मासेमारी करत असतात. बंदी कालावधीत धुडगूस घालून बेकायदा मासेमारी करणाऱ्या परराज्यातील या बडय़ा ट्रॉलर्सवाल्यांना अटकाव करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे धाडस संबंधित शासकीय यंत्रणा दाखवीत नाही, असा आरोप रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांतील मच्छीमार करत असतात. परंतु त्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे हा बंदी आदेश केवळ कोकणातील मच्छीमारांसाठीच आहे की काय, असा सवालही त्यांना पडला आहे. कोकणातील हजारो मच्छीमार कुटुंबांचा मासेमारी हा एकमेव महत्त्वाचा व्यवसाय आहे, किंबहुना कोकणची आर्थिक नाडी असलेला हा व्यवसाय देशाला हजारो कोटींचे परकीय चलन मिळवून देणारा म्हणून सर्वज्ञात आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या व्यवसायावर मत्स्य दुष्काळाचे संकट ओढवले असून, यावर उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छीमारांसह वाहतूकदार, बर्फाच्या फॅक्टऱ्या, लहानसहान व्यावसायिक आर्थिक डबघाईस आले आहेत. डिझेलच्या किमतीत होणारी भरमसाठ वाढ, महागाई, खलाशी वर्गाचे वाढलेले पगार व अन्य खर्च यामुळे मच्छीमार विवंचनेत सापडलेला आहे. बँकेचे कर्ज आणि व्याज तसेच व्यापाऱ्यांकडून घेतलेला अ‍ॅडव्हान्स याच्या ओझ्याने हा मच्छिमार दबून गेलेला आहे. अशा या मच्छीमाराला शासनाने आर्थिक सहाय्य करण्याचे तर दूरच, पण गेल्या हंगामात खरेदी केलेल्या डिझेल तेलावरील तीन ते चार महिन्यांच्या  परताव्याची रक्कम अद्याप मिळालेली नाही, असे मच्छीमार संस्थेच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
जिल्ह्य़ातील अनेक बंदरे गाळात रुतलेली असून या बंदरांसह विविध खाडय़ांमध्ये साचलेला गाळ उपसण्यास गेल्या अनेक वर्षांपासून नुसती आश्वासने दिली जात आहेत. रत्नागिरी जिल्ह्य़ात यांत्रिक व बिगर यांत्रिक बोटी व होडय़ांची एकूण संख्या २५७८ एवढी असून, त्यापैकी दाभोळ-७५१, गुहागर-४२५, जयगड-३०३, रत्नागिरी-८६२ आणि साखरीनाटे २३७ बोटी आहेत. १० जून ते १५ ऑगस्ट किंवा नारळीपौर्णिमा या कालावधीत मासेमारीला कायद्याने बंदी असली तरी रत्नागिरी व सिंधुदुर्गातील मासेमारी मात्र २० मेपासून बंद केली जाते. यंदा  उद्याच्या नारळीपौर्णिमेपासून सुरुवात होणार असल्याने गेल्या दहा-बारा दिवसांपासून सर्वच बंदरांमध्ये मच्छीमारांची लगबग सुरू झाली. खलाशी आणि वाहनधारकांची वर्दळ सुरू झाली. परंतु १६ ऑगस्टपासूनच पावसाचे पुन्हा आगमन झाले आणि मच्छीमारांच्या उत्साहावर पाणी पडले. त्यातच वादळी वारेही सुरू झाले असून, आज दुपापर्यंत स्वच्छ असलेले वातावरण पुन्हा बिघडले. पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे. शासनाच्या बंदी आदेशाचा कालावधी संपल्यानंतर लगेचच वारा-पाऊस यांच्या रूपाने निसर्गाने आपला बंदी आदेश लागू करून यंदाच्या मासेमारी हंगामाला ‘ब्रेक’ लावला आहे.