हर्षद कशाळकर

मासेमारीसाठी एलईडी दिव्यांच्या वापर करण्यात केंद्र सरकारने बंदी घातली आहे. याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. मात्र शासनाच्या परिपत्रकानंतरही एलईडी दिव्यांच्या साह्य़ाने मासेमारी करण्याचे प्रकार थांबल्याचे दिसून येत नाही. कोर्लईजवळच्या समुद्रात एलईडी दिव्यांच्या साह्य़ाने मासेमारी करण्यावरून दोन गटांत तणाव निर्माण झाला. त्यामुळे बंदीनंतरही मच्छीमारांकडून जास्त मासे मिळावे यासाठी एलईडी दिव्यांचा वापर सुरूच असल्याचे दिसून येत आहे. शासनाने अशा पद्धतीने होणाऱ्या मासेमारीवर कठोर कारवाई करण्याची मागणी मच्छीमार संघटनांनी केली आहे.

रात्रीच्या वेळी खोल समुद्रात मासेमारी करताना एलईडी दिव्यांचा वापर करण्याचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले होते. लाइटमुळे आकर्षति होऊन मासे जाळ्यात अलगद सापडत असत. मात्र यामुळे लहान-मोठय़ा सर्वच प्रकारच्या प्रजाती नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारी करताना एलईडी बल्बचा वापर करण्यास निर्बंध घालावेत, अशी माणगी रायगड जिल्ह्य़ातील मच्छीमार संघटनांनी केली होती.

त्यानुसार केंद्र सरकारने २९ ऑगस्ट २०१६ ला काही अटी व शर्तीसह एलईडी मासेमारीला दिलेली परवानगी केंद्र सरकारने रद्द केली आहे. देशभरातील कुठल्याच किनाऱ्यांवर आता एलईडी बल्ब्सच्या साह्य़ाने मासेमारी करता येणार नाही. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात याबाबतचे एक परिपत्रक केंद्र सरकारने जारी केले.

एलईडी मासेमारी पद्धतीमुळे समुद्रातील माशांचे प्रमाण कमी होईल, त्याचबरोबर संपूर्ण सागरी जैवविविधताच धोक्यात येईल, अशी भीती व्यक्त केली जात होती. किनारपट्टय़ावर होणारी बांधकाम, खारफुटींची कत्तल, खाडीकिनाऱ्यावर होणारे भराव, डिझेलचे वाढते दर, मजुरांची कमतरता, महागाई आणि हवामानातील बदल यामुळे आधीच मासेमारी अडचणीत सापडली आहे. अशात मत्स्य प्रजातींचे अस्तित्वच धोक्यात आल्यास त्याचा मोठा परिणाम स्थानिक मच्छीमारांना भोगावा लागण्याची शक्यता होती. त्यामुळे करंजा येथील मच्छीमार संघटनेनी केंद्र सरकारकडे एलईडी लाइट मासेमारीवर निर्बंध घालण्याची विनंती केली होती. या मागणीनुसार केंद्र सरकारने अशा पद्धतीने होणाऱ्या मासेमारीवर निर्बंध घातले आहेत. मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी एलईडी लाइटचा वापर करून मासेमारी करणाऱ्या मच्छीमार संस्थांवर कारवाई करण्यात येईल, असेही जाहीर केले आहे. ज्या मच्छीमार संस्था एलईडी दिव्यांच्या साह्य़ाने मासेमारी करणाऱ्या बोटींना संरक्षण देतील, त्यांना शासनाकडून पुरविण्यात येणाऱ्या सुविधा रद्द करण्यात येतील, अशी तंबी त्यांनी दिली होती. मे महिन्यात १२ बोटींवर मत्स्यव्यवसाय विभागाने कारवाईदेखील केली होती.

मात्र बंदीनंतरही जास्त मासे मिळावेत या हव्यासातून रात्रीच्या वेळी एलईडी दिव्यांच्या साह्य़ाने मासेमारी सुरूच आहे. कोर्लई येथे समुद्रात एलईडी दिव्यांच्या साह्य़ाने मासेमारी करणारी एक बोट मच्छीमारांना दिसून आली. त्यांनी दिव्यांच्या साह्य़ाने मासेमारी करणाऱ्या बोटीस हटकले यावरून दोन गटांत तणाव निर्माण झाला. त्यामुळे शासनाने अशा पद्धतीने होणाऱ्या मासेमारीवर कठोर कारवाई करण्याची मागणी मच्छीमार संघटनांनी केली आहे.

रायगड जिल्ह्य़ाला २२४ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. या किनाऱ्यावर मासेमारी बोटींवर लक्ष्य ठेवण्यासाठी एकच बोट सध्या कार्यरत आहे. रात्रीच्या वेळी कारवाई करण्यात तांत्रिक अडचणी आहेत. याचा फायदा घेऊन काही मच्छीमार रात्री एलईडी दिव्यांचा वापर करून खोल समुद्रात मासेमारी करत आहेत.

शासनाने एलईडी दिव्यांच्या साह्य़ाने मासेमारी करण्यास बंदी घातली आहे. मात्र तरीही जर मासेमारीसाठी या दिव्यांचा वापर केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, त्यांचे परवाने रद्द केले जातील, डिझेल पुरवठा बंद होईल, वेळ पडल्यास फौजदारी कारवाई करण्याची आमची तयारी आहे.

– अभयसिंह शिंदे, साहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त