* कोकणातील बंदरे पुन्हा गजबजू लागली
* खासगी पेट्रोलपंपांवर डिझेल खरेदीसाठी मच्छीमारांची गर्दी
मच्छीमार सहकारी संस्थांचा किरकोळ खरेदीदार म्हणून समावेश करण्यात आल्याचे केंद्रीय पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोइली यांनी जाहीर केल्याने मासेमारी बंद आंदोलन मागे घेण्याचा निर्णय मंगळवारी वर्सोवा येथे झालेल्या संघटनांच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती, लतीफ महालदार यांनी दूरध्वनीवरून लोकसत्ताशी बोलताना दिली. त्यामुळे मासेमारीला मंगळवारपासून सुरुवात झाली असून, गेले दोन आठवडे ओस पडलेली कोकण किनारपट्टीतील लहान-मोठी बंदरे आता पुन्हा गजबजू लागली आहेत.
डिझेलच्या दरात कपात करण्यात आली असल्याचे बोलले जात असले तरी त्याबाबतचा आदेश अद्याप तेल कंपन्यांना प्राप्त न झाल्यामुळे मच्छीमारांनी डिझेल खरेदीसाठी खासगी पेट्रोलपंपांवर तुफान गर्दी केल्याचे चित्र जिल्ह्य़ात सर्वत्र दिसून आले.
खासगी उद्योग समूह, महामंडळे यांच्याप्रमाणेच मोठय़ा प्रमाणात डिझेल खरेदी करणाऱ्या मच्छीमार सहकारी संस्थांचा समावेश घाऊक खरेदीदार म्हणून करण्यात आल्याने १७ जानेवारीपासून डिझेलच्या दरात प्रती लिटर ११ रुपये ६२ पैसे एवढी वाढ झाली. वास्तविक मच्छीमार संस्था अत्यल्प कमिशनवर आपल्या सभासद मच्छीमारांना किरकोळीने डिझेलचे वितरण करतात.  त्यामुळे या मच्छीमार संस्थांचा समावेश किरकोळ खरेदीदार म्हणून करावा, अशी मागणी मुंबई, कोकण, गोवा, गुजरात, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालसह देशभरातील मच्छीमारांनी करून त्यासाठी त्यांनी १८ जानेवारीपासून मासेमारी बंद आंदोलन छेडले होते.
दरम्यान, मच्छीमार संघटनांच्या नेत्यांनी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार व पेट्रोलियममंत्री वीरप्पा मोइली यांची भेट घेऊन ही अन्याय्य दरवाढ कमी करण्याची आग्रही मागणी केली होती. तर राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, उद्योगमंत्री नारायण राणे, खा. डॉ. नीलेश राणे यांनीही पेट्रोलियममंत्री मोइली, तसेच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन मच्छीमारांवरील लादण्यात आलेली डिझेल दरवाढ कपात करावी, अशी मागणी केली होती.
त्यानुसार १ फेब्रुवारीला पेट्रोलियम मंत्रालयाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे मच्छीमार संस्थांचा किरकोळ खरेदीदार म्हणून समावेश करण्यात येत असल्याचे जाहीर केले. मात्र डिझेलच्या किमतीत नेमकी किती कपात करणार याबाबतचा उल्लेख त्यात नसल्याने मच्छीमारांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. दरकपातीबाबतचा आदेश अद्याप न आल्याने, तसेच मासेमारीला सुरुवात होणार असल्याने जिल्ह्य़ातील मच्छीमारांनी खासगी पेट्रोलपंपांवर डिझेल खरेदी करून मंगळवारपासून मासेमारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे गेले १५ दिवस स्मशान शांतता पसरलेल्या बंदरांना आता जिवंतपणा आला आहे. समुद्रात बोटींच्या इंजिनांची धडधड सुरू झाली आहे. शीतगृहे कार्यान्वित झाली असून, ट्रक, टेंपोचालक मालक सक्रिय झाले आहे. गेले १५ दिवस मासेमारी बंद आंदोलनामुळे जिल्ह्य़ातील मत्स्य व्यवसायाचे सुमारे २५ ते ३० कोटींचे नुकसान झाल्याचे बोलले जाते.