‘वेव्ह रायडर बोया’ उपकरण कार्यान्वित
समुद्रातील लाटांची उंची, दिशा, वादळी हवामानाची शक्यता इत्यादी विविध प्रकारच्या सागरी स्थितीची माहिती देणारे ‘वेव्ह रायडर’ हे उपकरण कार्यान्वित करण्यात आले आहे. त्याव्दारे मिळणारी सूचना कोकणच्या किनारपट्टीवरील मच्छिमारांना एसएमएसव्दारे पाठवली जाणार आहे.
भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र, केंद्रीय भूविज्ञान मंत्रालय, राष्ट्रीय सागरी विज्ञान संस्था (पणजी) आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत किनारपट्टी व सागरी जैविक विविधता केंद्राव्दारे संयुक्तपणे हे उपकरण विकसित करुन येथील समुद्रामध्ये सोडण्यात आले आहे. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.विजय पांढरपांडे, भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्राचे (इन्कॉइस) डॉ. बाळकृष्ण नायर, डॉ.व्ही.एस. सोमवंशी, मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त व्ही.एन.घाटगे इत्यादी याप्रसंगी उपस्थित होते.
कोकणच्या समुद्र किनाऱ्यावरील जनता, तसेच मच्छिमारांना या उपकरणाचा विशेष फायदा होणार आहे. यापूर्वी २०१० मध्ये अशाच प्रकारचे उपकरण विद्यापीठाच्या केंद्रातर्फे समुद्रात सोडण्यात आले होते. आता त्याची क्षमता वाढवण्यात आली आहे. त्याबाबत मच्छिमारांना माहिती देण्यासाठी विशेष कार्यशाळाही आयोजित करण्यात आली. ‘इन्कॉईस’तर्फे एका वेळी एक हजार मच्छिमारांना एसएमएसचा लाभ मिळणार आहे. मात्र या पुढील सहा महिने समुद्र शांत असतो. त्यामुळे या उपकरणाचा खरा उपयोग आणि लाभ जून महिन्यापासून सुरु होईल.