सन २००५ च्या अतिवृष्टीनंतर शासनाने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांपकी एक म्हणजे सर्व महसूल मंडळांमध्ये पर्जन्यमापक बसविण्याचा. आता त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली असून जिल्ह्य़ातील ६० महसूल मंडळांमध्ये पर्जन्यमापक यंत्रे बसविण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या पर्जन्यमापकांमुळे पडणाऱ्या पावसाचे अचूक मोजमाप करणे शक्य होणार आहे. सर्वसाधारण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक पर्जन्यमापक असते. त्यावरूनच संपूर्ण तालुक्यातील पावसाचा अंदाज बांधला जातो. परंतु तालुक्याच्या विविध भागांमध्ये पडणाऱ्या पावसाचे प्रमाण कमी-अधिक असते. त्यामुळे हे अंदाज अचूक ठरत नाहीत. परिणामी अतिवृष्टी किंवा दुष्काळग्रस्त शेतकरी, पावसामुळे वित्तहानी झालेले नागरिक यांना सरकारी मदत देण्यात कायदेशीर अडचणी जाणवतात. तसेच पावसामुळे उद्भवणाऱ्या नसíगक आपत्तीवर पूर्वनियोजन करता येत नाही. या सर्व बाबींचा विचार करून सरकारने प्रत्येक जिल्ह्य़ातील महसूल मंडळांमध्ये पर्जन्यमापक बसविण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. त्यानुसार रायगड जिल्हा नियोजन व विकास समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत यासाठी १४ लाख ७० हजार रुपये इतका निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. आतापर्यंत जिल्ह्य़ातील ६० पकी ३५ महसूल मंडळांमध्ये पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आली असून उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल, असे जिल्हाधिकारी एच. के. जावळे यांनी सांगितले.  जागतिक हवामान संघटना व भारतीय हवामान विभागाची मान्यता असलेल्या मेटॉस इन्स्ट्रमेन्ट इंडिया प्रायव्हेट लि. या कंपनीवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पर्जन्यमापके बसविण्याची ठिकाणे जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी व महसूल विभाग यांच्या संयुक्त पाहणीनंतर निश्चित करण्यात आली. हे पर्जन्यमापक डिजिटल व स्वयंचलित असून त्यावर पावसाची अचूक नोंद मिळणार आहे. दररोज ही नोंद घेण्याची जबाबदारी संबंधित मंडळातील मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, कृषी सहायक यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तालुक्यातील सर्व पर्जन्यमापकांवरील नोंदीची बेरीज करून सरासरीने त्या तालुक्यातील पावसाची नोंद निश्चित केली जाणार आहे. यातून मिळणाऱ्या पावसाच्या अचूक नोंदीमुळे संभाव्य पूरबाधित, दरडग्रस्त यांना पूर्वसूचना देणे शक्य होणार असल्याचे जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले.