25 March 2019

News Flash

पोलीस उपनिरीक्षक चिडे हत्याप्रकरणी पाच आरोपींना अटक

पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे हत्याप्रकरणी नागभीड पोलिसांना एकूण १३ पैकी पाच आरोपींना अटक करण्यात यश आले आहे.

चिडे यांना श्रद्धांजली अर्पण करताना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर 

पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे हत्याप्रकरणी नागभीड पोलिसांना एकूण १३ पैकी पाच आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. सर्व आरोपी लगतच्या गडचिरोली जिल्हय़ातील असून आज ब्रह्मपुरी न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

दरम्यान, अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करताना पोलिसांच्या अंगावर येत असेल तर शस्त्राचा उपयोग करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिले आहेत.

नागभीडचे प्रभारी ठाणेदार छत्रपती चिडे मंगळवारी गस्तीवर असताना अवैध दारू तस्करांनी स्कॉर्पिओ वाहन त्यांच्या अंगावर नेऊन अक्षरश: चिरडले. यात चिडे गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अवैध दारू तस्करांची दादागिरी बघता पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वात ब्रम्हपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी यांनी तपासाची चक्रे फिरवली आणि १३ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. या १३ पैकी पाच आरोपींना अटक करण्यात परदेशी यांना यश आले आहे.

दरम्यान, चिडे हत्याप्रकरणी आरोपींची संख्या यापेक्षाही अधिक असल्याची माहिती परदेशी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. ज्या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे, त्या सर्व आरोपींना अटक केल्याशिवाय त्यांची नावे माध्यमांना सांगण्यात परदेशी यांनी स्पष्ट नकार दिला. दरम्यान, या प्रकरणात चंद्रपूर व गडचिरोली जिल्हय़ातील मोठे मद्य तस्कर गुंतले असल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यामुळे ज्या १३ आरोपींची नावे आज समोर आली आहेत, त्यात आणखी भर पडण्याची शक्यताही परदेशी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. ज्या पाच आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, ते सर्व गडचिरोली जिल्हय़ातील रहिवासी असल्याची माहिती आहे. अटक केलेल्या पाचही आरोपींना आज ब्रम्हपुरी न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यातील सर्वच आरोपींची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

अवैध दारूविक्रेत्याची ठाणेदाराला दमदाटी

नागभीड येथील घटनेची शाई वाळत नाही तोच कोठारी येथील पोलीस निरीक्षक संतोष अंबिके यांच्यासोबत अवैध दारू विक्रेत्याने दमदाटी करीत धक्काबुक्की केली. वातावरण तापल्यामुळे ठाणेदार अंबिके यांना परत जावे लागले. नंतर ठाणेदारांनी चार जणांवर गुन्हे दाखल करून अटक केली. कोठारीचे पोलीस निरीक्षक संतोष अंबिके यांना माहिती मिळाली होती की, सराईत दारूविक्रेता बबलू जाधवच्या घरी अवैध दारू विक्री करीत आहे. तात्काळ अंबिके हे आपल्या पथकासह जाधव यांच्या घरी पोहोचले. घराची झडती घेण्यासाठी अंबिके समोर गेले असता अवैध दारूविक्रेता जाधव यांच्या पत्नीने अंबिके यांना आत जाण्यास मज्जाव केला. ठाणेदारांनी त्यांना शासकीय कामात अडथळा आणू नका, अशी विनंती केली. मात्र, तरीही जाधव यांची पत्नी ठाणेदारांसोबत अरेरावी करीत होती. दरम्यान, ती अंगावर येताच महिला पोलिसांनी तिला थांबवले. यावर महिला पोलिसांना धक्काबुक्की केली. तसेच खाली पाडून जखमी केले. दरम्यान, याप्रकरणी ठाणेदार अंबिके यांनी चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे.

१० लाखाचे अर्थसहाय्य

दिवंगत पोलीस उपनिरीक्षक छत्रपती चिडे यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाख रुपयांचे अर्थसहाय्य प्रदान करण्यात येणार आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी चिडे कुटुंबीयांना १० लाखाचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय जाहीर केला.

छत्रपती चिडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

छत्रपती चिडे यांचे पार्थिव काल बुधवारी सकाळी पोलीस मुख्यालयात आणण्यात आले. तिथे त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडण्यात येऊन सलामी देण्यात आली. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, खासदार विकास महात्मे, आमदार संजय धोटे, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी तसेच नातेवाईकांनी चिडे यांचे अंतिम दर्शन घेऊन मानवंदना दिली. यावेळी केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी चिडे कुटुंबीयांचे सांत्वन केले तसेच चिडे यांना शहिदाचा दर्जा देण्यास मुख्यमंत्री फडणवीस यांनी संमती दिल्याचेही सांगितले. त्यानंतर कालच प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत शांतीधाम स्मशानभूमीत चिडे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या मुलाने त्यांना अग्नी दिला.

First Published on November 9, 2018 12:21 am

Web Title: five accused arrested in sub inspection murder