बीड : बालविवाह कायद्याने गुन्हा असला तरी गेल्या दोन महिन्यांच्या टाळेबंदीत अल्पवयीन मुलींच्या लग्नाचा ‘बार’ उडवून देण्याची घाई बालवधू पित्यांच्या अंगलट आली आहे. बालविवाहाची आठ प्रकरणे समोर आली असून त्यापैकी पाच बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले असून तीन प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत.

बीड  तालुक्यातील करचुंडी येथील बालविवाह प्रकरणी शुक्रवारी नेकनूर (ता.बीड) पोलीस ठाण्यात नवरदेवासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ग्रामीण भागात आजही अल्पवयीन मुलींचे लग्न करून दिले जात असल्याचे वारंवारच्या घटनांवरुन स्पष्ट होत आहे. मे, जूनच्या टाळेबंदीत बालविवाहाची आठ प्रकरणे समोर आली आहेत. बीड तालुका ३,  गेवराई २, पाटोदा,  शिरूर, वडवणी तालुक्यातील प्रत्येकी एक बालविवाहाची प्रकरणे समोर आली. देव पिंपरी (ता.गेवराई), करचुंडी (ता.बीड) आणि वडवणी येथील बालविवाहाच्या प्रकरणात गुन्हा नोंद करण्यात आला असून पाच बालविवाह प्रशासनाने रोखले आहेत. शासन आणि प्रशासनाकडून बालविवाह रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात असले तरी समाजाची मानसिकता अजूनही बदलायला तयार नाही हेच अशा घटनांवरुन समोर येऊ लागले आहे. टाळेबंदी आणि मोजक्याच लोकांच्या उपस्थितीचा फायदा घेत बाल वधू पित्यांकडून विवाह सोहळा आटोपला जात आहे.

मात्र गावातील काही लोकांची सतर्कता आणि बाल हक्क समितीची सजगता यामुळे बालविवाह रोखले जात आहेत.