पाच शेतकऱ्यांचा लातुरात बुडून मृत्यू
बैलपोळ्याच्या दिवशी बैल धुवायला जाताना पाय घसरून पाण्यात पडल्याने दोन गावांमध्ये ५ शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्ह्य़ातील उदगीरजवळील हेर गावात कमलाकर बदुरे (५५) हे आपल्या सिद्धेश्वर (२०) व रुपेश (२४) या मुलांसह बैल धुण्यासाठी पाझर तलावावर गेले होते.
बैल धुवत असताना सिद्धेश्वरचा पाय घसरून तो पाण्यात पडला. त्याला वाचविण्याचा रुपेशने प्रयत्न केला, पण तोही बुडाला. त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरलेल्या कमलाकर यांचाही मृत्यू झाला.
औसा तालुक्यातील वाघोली गावात धोंडीराम मोरे (५५) आपल्या नानासाहेब (१८) या मुलासह बैल धुण्यासाठी पाणवठय़ावर गेले होते. नानासाहेब बुडत असल्याचे पाहून त्याला वाचविण्यासाठी मोरे यांनी पाण्यात उडी मारली, पण दोघेही बुडून मरण पावले. बैलपोळ्याच्या दिवशी पाच जणांना अशा प्रकारे जीव गमवावा लागल्यामुळे हेर व वाघोली गावांत शोककळा पसरली.

 यवतमाळमध्येही तिघांचा मृत्यूपोळ्याच्या दिवशी पोहायला गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा डोहाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दिग्रसजवळील पेरू गावात घडली. दिग्रस-पुसद मार्गावरील दिग्रसपासून ८ किमी अंतरावरील इसापूर येथील विजय घोलप (१२), गजानन घोटी (१४) आणि अंकुश पाचोरे (१२) हे तीन विद्यार्थी गुरुवारी सकाळी १० च्या सुमारासपेरू गावाजवळील धावंडा नदीच्या डोहात पोहायला गेले असताना डोहाच्या भोवऱ्यात गटांगळ्या खात तिघेही बुडून मरण पावले. दिग्रसच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर इसापूर येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.