मराठवाडय़ात गारपिटीमुळे एवढे नुकसान झाले की, शेतकऱ्यांना ते असह्य़ होत आहे. गेल्या २४ तासात मराठवाडय़ात पाचजणांनी आत्महत्या केली. गेल्या ४ दिवसांत १४ जणांनी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. उस्मानाबाद जिल्ह्य़ातील आळणी येथील शेतकरी अनिल विठ्ठल कुलकर्णी (वय ५६) यांनी कर्जास कंटाळून मंगळवारी आत्महत्या केली. औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील दिगंबर गंगाराम राऊत यांनी विष घेऊन आत्महत्या केली. हिंगोली, नांदेड, बीड जिल्ह्य़ांतही तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
हातातोंडाशी आलेला घास गारपिटीमुळे हिरावून घेतला गेल्याने झालेले नुकसान व बँकांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी चिंतातूर झाला. या हतबलतेतूनच गेल्या काही दिवसांत १४ जणांनी स्वत:ची जीवनयात्रा संपविली. उस्मानाबादेत कळंब तालुक्यातील देवळाली येथील राजेंद्र लोमटे या शेतकऱ्याने स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. त्याचाही मंगळवारी मृत्यू झाला. हिंगोलीत दोघा शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणातून आत्महत्या केल्या.
आळणी येथील अनिल कुलकर्णी यांची सव्र्हे नंबर ५६२ मध्ये शेतजमीन आहे. त्यांनी १४ मार्चला आपल्या शेतातील गव्हाचे खळे करून भरडले होते. मात्र, गारपिटीने त्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. त्यांना खासगी सावकाराचे मोठे देणे होते. एका एकरमध्ये केवळ दोन पोते गहू निघाला होता. तोही पूर्ण काळा पडून खराब झाला. त्यामुळे खासगी देणे कसे फेडायचे याची चिंता त्यांना लागून होती. शनिवारी मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास कोणालाच काही न सांगता घरातून निघून गेले होते. मंगळवारी त्यांचा मृतदेह आढळला.
नांदेडातील संख्या चारवर
नांदेड – नांदेडात आत्महत्येचे सत्र कायम असून, हदगाव तालुक्यातील कोळी येथील यादव चंपती पतंगे या शेतकऱ्याने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात गारपिटीने गहू, हरभरा, सोयाबीन आदी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. गत पंधरवडय़ात जिल्ह्यात ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. कोळी येथील यादव पतंगे यांना स्वतचे थोडेफार शेत होते. त्यांनी बँकेचे कर्ज घेतले होते. गारपिटीत पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत ते होते. या नराश्यातून सोमवारी त्यांनी शेतातील गोठय़ात गळफास घेतला. हदगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. याआधी संतुका गारोळे, मारोती जिल्हेवाड व रंगनाथ गंगवणे या ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. पतंगे यांच्या आत्महत्येने ही संख्या चार झाली आहे.
गळफास घेऊन आत्महत्या
बीड – डोक्यावर लाखभराचे कर्ज, रब्बी पीक गारपिटीने गेले. पाहुण्यांनी याच वर्षी बहिणीच्या लग्नाचा आग्रह धरला. त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेने तणावग्रस्त अवस्थेत २३ वर्षीय शेतकऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी पहाटेस हा प्रकार केज तालुक्यातील चंदन सावरगाव येथे घडला. बिभिषण श्रीकृष्ण तपसे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. वडिलांची पारंपरिक १३ एकर शेती तो कसत होता. कुटुंबासाठी उत्पन्नाचा एकमेव मार्ग शेतीच असल्यामुळे काही दिवसांपूर्वी ९० हजार रुपयांचे कर्ज काढून तपसे याने शेतीत पीक घेतले होते. खरीप व रब्बी दोन्ही पिकांचे गारपिटीत नुकसान झाले. हातात आलेले पीक गेल्यामुळे कर्ज फेडायचे कसे कुटुंब चालवायचे कसे, या विवंचनेत तो होता.
पेटवून घेऊन जीवन संपविले
िहगोली – बँकेच्या कर्जाची परतफेड कशी करावी? या विवंचनेतून शेतकऱ्याने स्वत:ला पेटवून घेत जीवनयात्रा संपविली. कळमनुरी तालुक्यातील हिवरा येथे हा प्रकार घडला. सोपान भीमा गोडबोले (वय ३६) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. आखाडा बाळापूर पोलिसांत या प्रकरणी नोंद झाली. सोपानकडे दोन एकर जमीन आहे. त्यावर कर्ज झाल्याने कर्जाची परतफेड कशी करावी, या विवंचनेत सोपानने सोमवारी रात्री अकराच्या सुमारास राहत्या घरी स्वतला पेटवून घेतले. यात गंभीर भाजल्याने त्याला तत्काळ नांदेड येथील रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचार चालू असतानाच सकाळी सोपानचा मृत्यू झाला. त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिल्यावर आखाडा बाळापूर पोलिसात याची नोंद करण्यात आली.