जालना जिल्ह्य़ात चालू वर्षांतील जानेवारी ते नोव्हेंबर या अकरा महिन्यांत महिलांवरील बलात्काराचे ३५ गुन्हे दाखल झाले आहेत. त्याप्रमाणे छेडछाड आणि विनयभंगाचे २३९ गुन्हेही याच कालावधीत जिल्ह्य़ातील विविध ठिकाणच्या पोलीस ठाण्यांमध्ये नोंद झालेले आहेत. या व्यतिरिक्त कौटुंबिक हिंसाचाराचे २५० पेक्षा अधिक गुन्हेही दाखल झालेले आहेत.

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविणे, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थिनींसह महिलांची छेड काढणे, बदलत्या समाज माध्यमांचा वापर करून महिलांना त्रास देणे आदी घटना घडलेल्या आहेत. माहेरावरून पैसे आणले नाहीत म्हणून सासरच्या मंडळींकडून छळ होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. चालू डिसेंबर महिन्यांतही अल्पवयीन मुलगी त्याचप्रमाणे महिलेवर बलात्काराचे तीन गुन्हे जालना शहरातील पोलिसांनी दाखल केले आहेत. शहरातील एका मतिमंद मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून सदर बाजार पोलिसांनी औरंगाबाद शहरातील मुकुंदवाडी भागातील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीस अटक केली आहे. तर लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर सव्वा महिना बलात्कार करून नंतर लग्नास नकार दिल्याची तक्रार शहरातील एका रुग्णालयात सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या महिलेने पोलिसांकडे दिली आहे. गेल्या २३ नोव्हेंबर रोजी शहरातील सुंदरनगर भागातून बेपत्ता झालेल्या तेरा वर्षे वयाची मुलीची चंदनझिरा पोलिसांनी हिंगोली जिल्ह्य़ातील सेनगाव येथून सुटका करून दोन महिलांसह एका पुरुषाला अटक केली. वडिलांसोबत झालेल्या किरकोळ भांडणाचा फायदा घेऊन अगोदर मनमाड येथे आणि नंतर हिंगोली जिल्ह्य़ात या मुलीस नेण्यात आले होते. या प्रकरणात अन्य गुन्ह्य़ांसह बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.