करोना संकटात राज्य सरकारनं आणखी पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये मुंबई म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्यासह पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात शिर्डी येथील साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून के.एच. बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य सरकारनं पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात मुंबई म्हाडाच्या उपाध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर यांची वन विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव संजय खंदारे यांची महाजेनकोच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची मुख्य सचिवांच्या कार्यालयात उप सचिवपदी बदली करण्यात आली आहे. जलस्वराज्य प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक ए.ए.गुल्हाणे यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. शिर्डी येथील साई संस्थानच्या सीईओपदी सरकारकडून के.एच. बगाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुणे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती नाहीच?

पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात बदली झाली आहे. राम यांच्या बदलीमुळे पुणे जिल्हाधिकारी पद रिक्त झालं असून, पदाचा अतिरिक्त पदभार विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे दिला आहे. आज (१० ऑगस्ट) राज्य सरकारकडून पुणे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. मात्र, अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये पुणे जिल्हाधिकारीपदी कुणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.