७४० पथके नियुक्त; वसई ग्रामीणमध्ये मोहिमेला आरंभ

पालघर : जिल्ह्यातील करोनाचा सध्याचा सरासरी मृत्यूदर १.७३ टक्के इतका आहे. तो घटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. दोन टप्प्यांत हा उपक्रम राबविण्यात येईल.  यात चार लाख ९५ हजार कुटुंबीयांची तपासणी केली जाईल. ७४० पथकांकडून कुटुंब सदस्यांची माहिती संकलित केली जाणार आहे.

जिल्ह्यात सध्या ११ हजारांहून अधिक रुग्ण आहेत. चाचणी केलेल्या नागरिकांच्या सुमारे २१ टक्के नागरिकांना संसर्ग झाला आहे. त्यापैकी ८६ टक्के रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा दर ३४ दिवसांवर आला आहे.  १९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वसई ग्रामीण, पालघर, डहाणू आणि वाडा तालुक्यात मृत्यूदर अधिक आहे.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या योजनेची माहिती सर्व सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच या मोहिमेअंतर्गत तपासणीसाठी येणाऱ्या पथकाला नागरिकांकडून सहकार्य मिळण्याच्या दृष्टीने पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी (आज) शुक्रवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

तपासणीत गैरव्यवहार?

पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात करोना उपचारांसाठी दाखल होणाऱ्या अनेक रुग्णांना आरोग्य अधिकारी ‘सिटी स्कॅन’ करण्यासाठी पाचारण करत असत. शासकीय सिटी स्कॅनचे दर २,२०० रुपये असताना अनेक रुग्णांनी ३,५०० ते ४०००रुपयांपर्यंत भरल्याचे दिसून आले आहे. शासकीय वैद्यकीय  अधिकाऱ्यांनी सिटी स्कॅनसाठी पाठवलेल्या रुग्णांचे शुल्क शासन कालांतराने भरणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्षात यापैकी बहुतांश रुग्णांनी स्वत:च्या खिशातून तपासणी शुल्काचा भरणा केल्याने या प्रकरणात कोटय़वधींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

उपक्रम असा

* जिल्ह्यात २१ सप्टेंबरपासून या मोहिमेस आरंभ होणार आहे. आशा कर्मचारी, आरोग्य सेविका यांच्यासह दोन स्वयंसेवकांच्या माध्यमातून आरोग्य पथकामार्फत रोज ५० घरांची पाहणी केली जाणार आहे. या पाहणीत ताप, रक्तातील प्राणवायूची मात्रा, करोनासदृश लक्षणे, इतर आजार आणि व्याधी यांची माहिती संकलित करून आवश्यकता भासल्यास संशयित रुग्णांना ताप निदान केंद्रात  दाखल करण्यात येणार आहे.

* रुग्णसेवेसाठी अधिक डॉक्टर उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांना पत्र लिहिण्यात आले आहे. याशिवाय स्थानिक पातळीवर खासगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहीत करताना या कामात निर्माण झालेल्या समस्यांवर तोडगा काढण्यात येईल.

* करोना केंद्रात मानसोपचारतज्ज्ञाची नियुक्ती करण्यात येणार आहे. रुग्णांना अधिक प्रमाणात करमणुकीचे साहित्य पुरवण्यात येणार आहे.

* सर्व समर्पित करोना रुग्णालयांमध्ये प्राणवायूची कमतरता भासणार नाही यासाठी रुग्णालयात लागणाऱ्या  इंजेक्शन आणि सीटीस्कॅन आकारणी शासकीय दरानुसार होईल.

* तक्रार निवारण सुविधा उभारण्यात येणार असून उपलब्ध खाटांची माहिती देणारा माहितीफलक (डॅशबोर्ड) सातत्याने अद्ययावत करण्यात येईल.

* ग्रामीण भागातील शासकीय रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी सर्व सुविधा विनामूल्य उपलब्ध करून दिल्या जातील. यासाठी जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांशी दर शनिवारी आढावा बैठक घेण्यात येईल.