पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे 16 एप्रिल रोजी झालेल्या हत्याकांड प्रकरणी कासा पोलिसांनी आणखी पाच आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना डहाणू न्यायालयात हजर केले असता त्यांना 13 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दोन साधू व त्यांच्या चालकाच्या हत्येच्या प्रकरणी यापूर्वी 110 जणांना पकडले होते. त्यापैकी नऊ जण अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधार गृहात पाठविण्यात आले. या हत्येमध्ये पोलीस 400 ते 500 आरोपींचा शोध घेत आहेत. अनेक आरोपी जवळच्या जंगलात लपून बसल्याने पोलीस ड्रोनच्या मदतीने कोंबिंग ऑपेशन करण्याच्या तयारीत आहेत.

16 एप्रिल रोजी गडचिंचले येथे घडलेल्या या हत्याकांडात दोन साधू व त्यांच्या वाहन चालकाची निर्घुणपणे हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी कासा पोलिसांनी सुमारे 400 ते 500 आरोपींविरुद्ध साधूंवर ठार मारण्याच्या हेतूने हल्ला करणे, साधूंचा खून केल्याचा व आरोपींचा शोध घेताना पोलिसांवर हल्ला करणे असे तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते.