सोलापुरात गुरुवारी रात्री उशीरा मिळालेल्या माहितीनुसार, शहरात ६४व्या नव्या करोनाबाधित रूग्णांची भर पडली. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण रूग्णसंख्या १,१४४ आणि मृत्युसंख्या ९९ वर पोहोचली आहे. दरम्यान, आतापर्यंत रूग्णालयांतून करोनामुक्त होऊन ४८४ व्यक्ती घरी परतल्या आहेत.

आज वाढलेल्या नव्या ६४ रूग्णांमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील २३ रूग्णांचा समावेश आहे. त्यापैकी १८ रूग्ण एकट्या कुंभारी (दक्षिण सोलापूर) येथील विडी घरकूल परिसरातील आहेत. शिवाय बार्शी व पंढरपूर येथेही आणखी रूग्ण सापडले आहेत. आज करोनाशी संबंधित एकूण ३५३ चाचणी अहवाल प्राप्त झाले. त्यातून ४३ पुरूष व २१ महिलांसह नवे ६४ रूग्ण सापडले. तर चार पुरूषांसह पाच जणांचा मृत्यू झाला. न्यू बुधवार पेठेतील एका ५४ वर्षाच्या मृत पुरूषाचा अपवाद वगळता सर्व मृत ५९ ते ७८ वर्षांचे वृध्द आहेत. आतापर्यंत ९९ व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत. यात पुरूषांची संख्या ६१ आहे. एकूण रूग्णांच्या ८.६५ टक्के मृतांचे प्रमाण दिसून येते.

महापालिकेतील एका अधिकाऱ्याला करोनाची लागण

सोलापुरात आज नव्याने आढळून आलेल्या रूग्णांमध्ये महापालिकेतील एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे. हा अधिकारी आयुक्त कार्यालयाच्या नेहमीच संपर्कात असतो. काल महापौर श्रीकांचना यन्नम व त्यांचे पती रमेश यन्नम यांनाच करोनाने बाधित केले होते. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी करोना विषाणू आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचल्यामुळे प्रशासनही अस्वस्थ झाले आहे. तर दुसरीकडे आज करोनाची लागण झालेले सहा रूग्ण हे डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी आहेत.