20 October 2020

News Flash

गडचिरोलीत पाच नक्षलवादी ठार

सी-६० पथकाच्या जवानांची कारवाई

(संग्रहित छायाचित्र)

सी-६० पथकाच्या जवानांची कारवाई

गडचिरोली : कोसमी-किसनेली जंगलात रविवारी सशस्त्र नक्षलवादी आणि सी-६० पथकाचे जवान यांच्यात चकमक झाली. त्यात पाच नक्षलवादी ठार झाले असून, त्यात तीन महिलांचा समावेश आहे.

गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील व पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पदाची सूत्रे स्वीकारताच नक्षल्यांच्याविरोधात आक्रमक मोहीम सुरू केली आहे. चार दिवसांपूर्वीच या दोन्ही अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत तसे संकेत दिले होते. यानंतर नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या धानोरा उपविभागात नक्षलविरोधी मोहीम सुरू केली. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया व पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांच्या नेतृत्वाखाली सी -६० पथकाचे कमांडो रविवारी सकाळपासून कोसमी-किसनेली जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबवत असताना नक्षलवाद्यांनी अचानक जवानांवर हल्ला केला. प्रत्युत्तरादाखल सी -६० जवानांनी नक्षल्यांवर गोळीबार केला. जवळपास अर्धा ते एक तास दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले.

शस्त्रसामुग्री संपताच नक्षलवाद्यांनी पळ काढला. गोळीबार थांबताच सी-६० पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. तिथे रक्ताचा सडा पडला होता. तिथे रक्ताच्या थारोळय़ात तीन महिला व दोन पुरुष नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले. मृत पाचही नक्षली गणवेशासह होते. घटनास्थळावरून मोठय़ा प्रमाणात नक्षल व इतर सामग्री जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पाचही नक्षल्यांचे मृतदेह गडचिरोली पोलीस मुख्यालयात आणण्यात आले असून, त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मृतांमध्ये नक्षल चळवळीतील कमांडर दर्जाचा नक्षलवादी असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे. गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील व पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या नेतृत्वातील ही पहिलीच कारवाई आहे.

गुप्त माहितीच्या आधारावर कारवाई

कोसमी-किसनेली जंगल परिसरात नक्षलवाद्यांचे शिबीर सुरू असल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली होती. त्याच आधारावर सी-६० पथकाने रविवारी सकाळपासून नक्षलविरोधी मोहीम सुरू केली. त्यात नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले असून, शोध मोहीम सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) मनीष कलवानिया यांच्याशी संपर्क साधला असता, चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाल्याची माहिती त्यांनी दिली. चकमकीत टिपागड कंपनी क्रमांक ४  व प्लाटून दलम कंपनी क्रमांक १५ चे किमान ४० ते ५० नक्षलवादी सहभागी होते, असे समजते.

नक्षलविरोधी मोहीम

’कसनासूर-बोरीयाच्या जंगलात २०१८ मध्ये झालेल्या चकमकीत ४० नक्षलवादी ठार झाले होते.

’त्यानंतर झालेल्या विविध चकमकींत २० नक्षलवादी ठार झाले; ५५ नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली तर ४३ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले.

’अटक केलेल्यांमध्ये नर्मदाक्का आणि किरणकुमार हे दोन जहाल नक्षली आहेत, तर चकमकीत ठार झालेल्यांमध्ये दोन डीव्हीसी कमांडर सृजनक्का व रामको तथा दोन दलम कमांडर यांचा समावेश आहे. आता पुन्हा नक्षलविरोधी मोहिमेला वेग आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2020 12:45 am

Web Title: five naxalites killed in gadchiroli zws 70
Next Stories
1 रोखेविक्रीतून राज्याची तिप्पट कर्जउभारणी!
2 टीका केल्यामुळेच मुख्यमंत्री घराबाहेर पडले – चंद्रकांत पाटील
3 केंद्राचा महाराष्ट्राबाबत दुजाभाव – राजू शेट्टी
Just Now!
X