दोन पोलीस गंभीर जखमी

छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्हय़ातील जंगलात नक्षलवादी आणि जिल्हा राखीव पोलीस दलाच्या पथकात शनिवारी सकाळी झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार, तर दोन पोलीस गंभीर जखमी झाले.

नारायणपूरलगतच्या ओरछा जंगलात नक्षलवाद्यांचे प्रशिक्षण शिबीर सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर जिल्हा राखीव पोलीस दलाच्या गस्ती पथकाने तेथे छापा घातला. नक्षलवाद्यांनी पोलीस पथकावर गोळीबार सुरू केला. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. त्यात पाच नक्षलवादी ठार झाले. ओरछा पोलीस ठाण्यापासून सुमारे २० किलोमीटरवरील धुरबेडा खेडय़ाजवळील जंगलात सकाळी ६ वाजता ही चकमक झडल्याची माहिती पोलीस महासंचालक डी. एम. अवस्थी यांनी दिली. घटनास्थळावरून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला. चकमक सुमारे दीड तास सुरू होती. त्यानंतर नक्षलवादी जंगलात पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळी शोधमोहीम राबवली असता त्यांना नक्षलवाद्यांचे पाच मृतदेह सापडले, असे अवस्थी यांनी सांगितले. या चकमकीत दोन पोलीस जखमी झाले असून, त्यांना रायपूर येथे हलविण्यात आले.