लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : बुलडाणा जिल्ह्यात आणखी पाच नवीन रुग्ण शुक्रवारी आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या ८२ झाली. दरम्यान, आज तीन जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

बुलडाणा जिल्ह्यातील नमुने अकोला येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी पाठविलेल्या अहवालांपैकी ५१ अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी ४६ अहवाल नकारात्मक, तर पाच अहवाल सकारात्मक आले आहेत. करोनाबाधित आढळलेल्या रुग्णांमध्ये खामगाव येथील पुरवार गल्ली भागातील २७ वर्षीय महिला, बुलढाणा शहरातील वावरे ले आऊट भागातील ३३ वर्षीय महिला, मोताळा तालुक्यातील शेलापूर येथील २५ वर्षीय महिला, २८ वर्षीय पुरुष आणि मोताळा तालुक्यातीलच पलढग येथील १९ वर्षीय तरुणीचा समावेश आहे.

यामध्ये खामगाव येथील रुग्ण आधीच्या करोनाबाधित रुग्णाच्या निकट संपर्कातील आहे. तसेच बुलडाणा, पलढग व शेलापूर येथील रुग्णांचा मुंबई प्रवासाचा इतिहास आहे. जिल्ह्याात आतापर्यंत एकूण ८२ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी तीन जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ५० जणांनी करोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सध्या रुग्णालयात २९ करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यातील आणखी ५१ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत एकूण १४१६ नकारात्मक आले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी. पुरी यांनी दिली. दरम्यान, आज बुलडाणा कोविड रुणालयातून दोन, तर शेगाव येथील एका रुग्णाला सुट्टी देण्यात आली.