ईदच्या सुटीनिमित्त गुहागरला आलेल्या मुंबईतील पाच पर्यटकांचा आणि दोन स्थानिक मुलींचा शनिवारी समुद्रात बुडून मृत्यू ओढवला. लाटेचा अंदाज न आल्यामुळे हे सातही जण खोल पाण्यात ओढले गेले.

चिपळूणच्या डीबीजे महाविद्यालयाचे उपप्राचार्य महम्मद शफी चांदा आणि त्यांचे मेव्हणे बद्रुद्दिन शेख यांची पत्नी किनाऱ्यावर असताना त्यांच्या डोळ्यांदेखत चांदा यांच्या दोन मुली तसेच बद्रुद्दिन शेख यांच्यासह त्यांची तिन्ही मुले व एक मुलगी मोठय़ा लाटेने समुद्रात खेचली गेली. या प्रकाराने हादरलेल्या चांदा यांनी आरडाओरडा केला, पण काही कळायच्या आत सातही जण बुडाले. यानंतर थोडय़ा वेळाने एकेक मृतदेह समुद्रकिनारी येऊ लागले. संध्याकाळी उशिरापर्यंत चार जणांचे मृतदेह हाती लागले होते. इतरांसाठी शोधमोहीम चालू होती.
चेंबूरच्या पांजरापोळवर शोककळा
चिपळूण/मुंबई : गुहागर समुद्रात बुडालेले पाचजण हे चेंबूर येथील पांजरापोळ परिसरात राहणारे होते. यामुळे या भागावर शोककळा पसरली आहे.
मृतांमध्ये मारिया महम्मद शफी चांदा (वय १७) व हीना महम्मद शफी चांदा (वय २१, दोघीही रा. चिपळूण), शेख बद्रुद्दिन युसूफ अल्ला (वय ४६) आणि शहाबाज (वय १८), महम्मद कादीर (वय १६) व जोया शेख (वय ९) ही त्यांची तीन मुलेआणि सुफिया (वय १७, सर्व रा. चेंबूर, मुंबई). शेख बद्रुद्दिन यांचे किराणा मालाचे दुकान होते.