प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळल्याने घडलेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील खामचौंदर गावाजवळ हा भीषण अपघात घडला आहे. बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. तर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ०६ वर नवापुर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात खासगी बस पुलावरुन दरीत कोसळल्याने हा भीषण अपघात झाला आहे. घाटातील दर्ग्याजवळ असणाऱ्या पुलावर रात्री तीन वाजेच्या सुमारास दरीत बस कोसळल्याने परिसरात मोठा आवाज झाला होता. हे सर्व प्रवासी ‘अंकल ट्रॅव्हल्स’च्या खासगी बसने जळगावहुन सुरतच्या दिशेने प्रवास करत होते. जवळपास ४० पेक्षा अधिक प्रवासी या बसमध्ये होते.

घटनेची माहीती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी मदतकार्य राबवत जखमींना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालायत दाखल केले. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ३५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. शिवाय, मृतांची संख्या वाढण्याची भीती देखील वर्तवण्यात आली आहे.

सुरूवातीला बसमध्ये अडकलेल्या जिवंत व जखमी प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम हाती घेण्यात आले. या अपघातील गंभीर जखमींची संख्या अधिक असल्याने विसरवाडीहुन खासगी गाड्यांनी या जखमींना पोलिसांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले होते. सध्या राष्ट्रीय महामार्गांवरील खड्डयांमुळे रस्त्यांची अक्षरशा चाळण झाली असल्याने हा महामार्ग मृत्युचा सापळा ठरत आहे. याकडे मात्र प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष होतांना दिसत आहे.