महायुती आणि आघाडीच्या फुटीनंतर रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांमध्येही पळापळ झाल्याने विदर्भातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. प्रकाश आंबेडकर, राजेंद्र गवई, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, सुलेखा कुंभारे या नेत्यांच्या वेगवेगळ्या भूमिकांमुळे होणारे मतविभाजन कुणाच्या पथ्यावर पडते, याचे औत्सूक्य राजकीय वर्तुळात आहे.
रिपब्लिकन पक्षाचा इतिहास हा विभाजनाचा आहे. ऐक्य प्रक्रियेचा असताना आतापर्यंत सत्ता स्थापन करण्याच्या व प्रतिनिधित्व मिळवण्याच्या स्पध्रेत गटा-गटांमध्ये विखुरलेल्या रिपब्लिकन पक्षांना फारसे यश मिळाले नाही. रिपब्लिकन शक्तीला आपल्या बाजूने वळवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीनंतर भाजप आणि शिवसेनेनेही जोरकस प्रयत्न केले, पण रिपब्लिकन पक्षाच्या अंतर्गत दुहीमुळे दुरावलेल्या लोकांना एकत्र आणण्यासाठी बसपनेही प्रयत्न चालवले. मध्यंतरीच्या काळात विदर्भात बसपच्या मतांची टक्केवारी वाढली होती. यावेळी बसप स्वबळावर रिंगणात आहे.
विदर्भात मोठा जनाधार असलेल्या रिपब्लिकन पक्षांच्या गटांपैकी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील भारिप-बहुजन महासंघ, डावे पक्ष आणि रिपब्लिकन सेना (आनंदराज आंबेडकर) महाराष्ट्र लोकशाही समितीच्या झेंडय़ाखाली निवडणूक लढवित आहेत. भारिप ९२ जागांवर लढत देत आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने दूर सारल्याने प्रकाश आंबेडकर यांची साथ घेऊन मागून निवडणूक लढणारे रिपब्लिकन पक्षाचे (गवई गट) डॉ. राजेंद्र गवई यावेळी मात्र आंबेडकरांसोबत नाहीत. पाच छोटय़ा पक्षांसमवेत त्यांनी महाशक्ती आघाडी स्थापन केली. फाटाफुटीनंतर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, पण युती जुळून आली नाही. त्यांची आघाडी यावेळी वेगळी लढत देत आहे. काँग्रेसवर विश्वासघात केल्याचा आरोप करीत बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या सुलेखा कुंभारे यांनी ऐनवेळी भाजपला पाठिंबा देऊन अनेकांना धक्का दिला. रिपब्लिकन पक्षाचा रामदास आठवले गट शिवसेनेची साथ सोडून भाजपसोबत गेल्याने त्यांच्या विदर्भातील समर्थकांसाठी हा दुसरा धक्का ठरला, तर काही महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या सहकार्याने विधान परिषदेत पोहोचलेले जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने काँग्रेससोबतच जाणे पसंत केले.
विदर्भातील ३३ मतदारसंघात निवडणुकांतील समीकरण बदलण्याची ताकद रिपब्लिकन पक्षांकडे आहे, पण ही शक्ती विखुरली गेली आहे. रिपब्लिकन जनाधाराच्या स्वाभाविक मर्यादांमुळे रिपब्लिकन पक्षाचे विदर्भाच्या राजकारणातील अस्तित्व नष्टही होत नाही आणि ते राजकारणात एका मर्यादेपेक्षा जास्त वाढूही शकत नाही, असे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.