शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख उमाताई बोरूडे यांच्यासह पारनेर नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी शनिवारी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आमदार नीलेश लंके यांच्या या खेळीमुळे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या बालेकिल्लय़ाला सुरुंग लागला आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचे अनेक नगरसेवक आ. लंके यांच्या संपर्कात होते. पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमातच हा पक्षप्रवेश करण्याचा आ. लंके यांचा प्रयत्न होता. परंतु काही नगरसेवकांनी अजित दादांच्या उपस्थितीत प्रवेश करण्याचा हट्ट धरल्यामुळे शनिवारी बारामतीमध्ये प्रवेशाचा सोहळा पार पडला. दुपारी पावणेबाराच्या सुमारास बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार यांनी शिवसेनेच्या महिला आघाडी तालुकाप्रमुख उमा बोरूडे यांच्यासह डॉ. मुदस्सिर सय्यद, नंदकुमार देशमुख, नंदा देशमाने, वैशाली औटी व किसन गंधाडे या नगरसेवकांच्या गळ्यात पक्षाचा पंचा टाकून पक्षात स्वागत केले.

या वेळी बोलताना आ. लंके यांनी पक्षात नव्याने आलेल्या कार्यकर्त्यांचा मान, सन्मान तसेच प्रतिष्ठा जपण्याचे अभिवचन देतानाच विधानसभा निवडणुकीत खांद्याला खांदा लावून खिंड लढविणाऱ्या कार्यकर्त्यांंमध्येही अंतर पडू देणार  नसल्याची ग्वाही त्यांनी दिली.नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता येताच पिण्याच्या पाण्याच्या शाश्वत योजनेचे काम सुरू झालेले असेल, त्याचा आराखडा आपल्याकडे तयार असल्याचे ते म्हणाले.

या वेळी आमदार नीलेश लंके यांच्यासह राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब तरटे, अशोक घुले, सहदेव तराळ, बाबासाहेब कुलट, दिनेश औटी, राजेश चेडे, विलास सोबले, राजेश चेडे, उपस्थित होते.