25 January 2021

News Flash

महाड इमारत दुर्घटना, दोघांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १८ जणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न

चौकशीसाठी विशेष तपास पथक नेमण्याची आदिती तटकरेंची मागणी

महाड मधील तारीक पॅलेस इमारत दुर्घटनेत आत्ता पर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर सात जखमींवर महाड  येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही १८ ते १९ जण दबले असल्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

इमारतीमध्ये ४५ फ्लॅट होते. ज्यापैकी १८ फ्लॅट रिकामे होते. इमारतीच्या ए विंग मध्ये ३० जण दुर्घटनेची चाहूल लागताच इमारतीतून बाहेर पडले. आठ जण बेपत्ता आहेत. तर बि विंग मध्ये ६० लोक राहत होते. यापैकी ५१ जण बाहेर पडले. तर ९ जण बेपत्ता आहेत. व दोन इतर असे एकुण १८ ते १९ जण बेपत्ता असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ढिगारा उपसण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. रात्री एक वाजण्याच्या सुमारास राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची तीन पथके घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी लगेचच मदत व बचाव कार्य सुरु केले. पहाटे पर्यंत वरच्या दोन मजल्यांचा ढिगारा उपसण्यात आला आहे.

घटनास्थळावरील मदत व बचावकार्याची  रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाणी केली आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर घटना स्थळावर उपस्थित आहेत. बांधकाम व्यवसायिकावर चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे.

आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ६० जणांची सुटका करण्यात आली आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला असून १८ जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

“जखमींवर उपचार सुरु असून काहींना डिस्चार्जही देण्यात आला आहे. जे गंभीर जखमी आहेत, त्यांना उपचारासाठी मुंबईत नेण्यात येत आहे. या दुर्घटनेची चौकशी सुरु झाली आहे. चौकशीसाठी विशेष तपास पथक नेमावे” अशी मागणी आदिती तटकरे यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2020 8:10 am

Web Title: five story residential building collapsed in mahad still people are trapped under debris dmp 82
Next Stories
1 स्वच्छतेत पालघरची पिछाडी
2 बांधकाम व्यावसायिकांना महापालिकेचा तडाखा
3 बसच्या फेऱ्या न वाढल्याने प्रवाशांचा गर्दीतून प्रवास
Just Now!
X