२७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
कोपर्डीतील घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असतानाच राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या जिल्ह्य़ातही अशीच माणूसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. गेल्या रविवारी, १७ जुलला येथील रेल्वे स्थानकावरून एका अल्पवयीन १६ वर्षीय मुलीला पाच नराधमांनी फूस लावून नेऊन तिच्यावर पाच दिवस सामूहिक अत्याचार केला. पोलिसांनी यातील पाचही आरोपींना २४ तासात अटक केली असून त्यांची २७ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
कलीम रफीक खान (२२, रा. आंबाटोली), मुकेश देविदास मेश्राम (३४, रा.दिनदयाल वार्ड, रामनगर), नितेश उर्फ लाला ब्राम्हणकर (२३,रा.सुंदरनगर, यादव चौक), छोटू उर्फ प्रशांत मोटघडे (२१,रा.राधाकृष्ण वार्ड, भीमनगर) व अभिजीत राजेश बडगे (१९,रा.भीमनगर, गोंदिया) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरुध्द भादंविची ३७६-ड, ३४३, ३६६, ५०६ कलमे व बाललंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा नोंदवून त्यांना आज, शनिवारी येथील न्यायालयात हजर केल्यावर २७ जुलैपर्यंत त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री ही घटना उघडकीस आल्यावर रेल्वे प्रशासनात खळबळ माजली. शनिवारी लोहमार्ग रेल्वे पोलिसांचे अप्पर पोलिस महासंचालक कनक रत्नम मुंबईहून, लोहमार्गचे पोलिस अधीक्षक खैरमोडे व उपविभागीय अधिकारी केजडे नागपूरहून आले. तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेशचंद शुक्ला, रामनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांनी तपास सुरू केल्यावर स्थानिक गुन्हे शाखेने एकाला, रामनगर पोलिसांनी दोघांना, तर उर्वरित दोघांना लोहमार्ग पोलिसांनी २४ तासात अटक केली.
ही मुलगी गोंदिया रेल्वे स्थानकाहून नातेवाईकांकडे जाण्यास निघाल्यावर ओळखीच्या आरोपीने मी तुला सोडून देतो, असे सांगून तिला दुचाकीवर नेले व आपल्या चार मित्रांच्या मदतीने येथील तीन विविध ठिकाणी डांबून सतत पाच दिवस तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. गुरुवारी, २१ जुलला त्यांनी तिला रेल्वे स्थानकावर सोडून तिला या प्रकरणाची वाच्यता कुठेही केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. मात्र, त्याच वेळी तिकीट तपासणी सुरू असतांना त्यांनी विचारल्यावर ती रडू लागली व तिने आपबिती त्यांना सांगितल्यावर तिकीट तपासणीसाने तात्काळ गोंदिया लोहमार्ग पोलिसांना माहिती दिली व यानंतर मुलीनेही या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिल्यावर त्यांनीही रेल्वे पोलिसात तक्रार दाखल केली होती.