News Flash

नाशिक जिल्ह्यत अपघातात पाच युवक ठार

वणी-नांदुरी-कळवण महामार्गावर खांडे मळ्याजवळ हा अपघात झाला.

वणी-नांदुरी मार्गावर शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास भरधाव मोटार झाडास धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात पाच ठार तर तीन युवक गंभीर जखमी झाले. मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीवरून परतत असताना हा अपघात झाला. मृत व जखमी हे सर्व वणी येथील रहिवासी आहेत.
वणी-नांदुरी-कळवण महामार्गावर खांडे मळ्याजवळ हा अपघात झाला. वणीतील काही युवक मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नांदुरी येथे गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास ते मोटारीतून माघारी निघाले. एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि मोटार रस्त्यालगतच्या झाडाला जाऊन धडकली व नंतर उलटली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, मोटारीचा अक्षरश: चक्काचूर झाला. त्यात साहील जावरे (२०), सईद सय्यद (१७), सचिन शेळके (२५), सकलेन सय्यद (१९), सचिन ढोले (३०) या युवकांचा जागीच मृत्यू झाला. इम्रान शेख, ज्ञानेश्वर धूम व रोशन खाडम हे जखमी झाले. अपघाताचा आवाज ऐकून आसपासच्या ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. गाडीची अवस्था इतकी भीषण होती की, अपघातग्रस्तांना बाहेर काढताना सर्वाची दमछाक झाली. जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे वणी गावात शोककळा पसरली. शनिवारी दिवसभर गावातील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2015 2:52 am

Web Title: five teenagers were killed in nashik accident
Next Stories
1 आठ वर्षांच्या मुलाचा साधूकडून खून
2 मिरजमध्ये ७३ जणांना वास्तुशांतीच्या जेवणातून विषबाधा
3 मंत्री राठोड यांच्या मतदारसंघात शेतकऱ्याची आत्महत्या
Just Now!
X