28 February 2021

News Flash

रत्नागिरी जिल्ह्य़ात किसान सन्मान योजनेचे पाच हजार लाभार्थी अपात्र

जिल्ह्य़ात सर्वाधिक आयकरदाते शेतकरी लाभार्थी रत्नागिरी तालुक्यात आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

देशातील शेतकऱ्यांना घरबसल्या वर्षांला ६ हजार रुपये देणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे रत्नागिरी जिल्ह्य़ातील ५ हजार २४३ लाभार्थी आवश्यक निकष पूर्ण करत नसल्याने अपात्र ठरले आहेत.

या लाभार्थीमध्ये काही आयकरदाते असूनही या योजनेचा लाभ घेतलेल्या २ हजार ४२३ शेतकऱ्यांकडून २ कोटी ११ लाख ५० हजार रुपये वसूल करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे, तर अन्य काही निकषांनुसार अपात्र ठरलेल्या २ हजार ८२० शेतकऱ्यांकडून ४७ लाख २२ हजार रुपये वसूल करण्यापूर्वी बाजू मांडण्याची संधी दिली जाणार  आहे.

या योजनेसाठी लाभार्थी शेतकऱ्यांची नोंद वेगाने पूर्ण करण्याच्या प्रशासकीय दबावामुळे अर्जदार अनुदानासाठी आवश्यक निकष पूर्ण करतो की नाही, यांची कागदोपत्री शहानिशा न करताच अनुदान वाटण्यात आले. अनेकांच्या अर्जासोबत आधार कार्डाचा तपशील जोडलेला नव्हता. तसेच अन्य काही निकषांमध्ये ते बसत नव्हते. तरीही त्यांना सरसकटपणे अनुदान देण्यात आले.

मात्र अनुदान वाटपानंतर अशा लाभार्थीची आधार कार्ड लिंक तपासली असता रत्नागिरी जिल्ह्य़ातील या योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांपैकी २ हजार ४२३ शेतकरी आयकरदाते असल्याचे उघड झाले. त्यांच्याकडून २ कोटी ११ लाख ५० हजार रुपये वसूल करण्यात येणार आहेत.

तसेच अन्य कारणांमुळे अपात्र ठरलेल्यांमध्ये जिल्ह्य़ातील २ हजार ८२० जणांचा समावेश आहे.

जिल्ह्य़ात सर्वाधिक आयकरदाते शेतकरी लाभार्थी रत्नागिरी तालुक्यात आहेत. या योजनेत ४९९ आयकरदात्या शेतकऱ्यांनी या तालुक्यात लाभ घेतला. सर्वात कमी आयकरदाते लाभार्थी शेतकरी चिपळूण तालुक्यात आहेत. तेथे २५ जणांनी नोंदणी केली. परंतु एकाही लाभार्थ्यांला रक्कम वितरित करण्यात आलेली नाही. मंडणगड तालुक्यातील १२६ आयकरदात्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला.

आयकरदाते असल्यामुळे लाभ स्वीकारण्यास ते अपात्र ठरतात. त्या सर्वाकडील रकमा भरण्यात याव्यात, असे तहसीलदारांनी कळवले आहे. रक्कम भरली नाही तर अतिरिक्त शुल्कासह सक्तीची वसुली करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

आयकरदाता शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी पात्र नाही. आयकराव्यतिरिक्त कारणांनी अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी संधी राहणार आहे. त्यांचे म्हणणे तहसीलदार ऐकून घेतील. तालुकास्तरीय समितीत छाननी करून ते शेतकरी खरोखरच अपात्र आहेत का, याची पडताळणी केली जाईल. या छाननीतून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना निधीचा लाभ मिळावा, अशी शिफारस तालुकास्तरावरून केली जाईल.

अपात्र कोण?

स्थानिक स्वराज्य संस्था सदस्य, चारचाकी वाहन किंवा अन्य सुविधा असलेल्या २ हजार ८२० शेतकऱ्यांचा अन्य अपात्रांमध्ये समावेश आहे. त्यांच्याकडून ४७ लाख २२ हजार रुपये वसूल केले जातील. त्यात संगमेश्वरमधील २ हजार ४९ शेतकऱ्यांकडे १० लाख ५४ हजार, रत्नागिरीतील २३२ शेतकऱ्यांकडील १ लाख ३८ हजार रुपये, खेडमधील एका शेतकऱ्याकडून ६ हजार, चिपळुणातील ४१५ लोकांकडून ३३ लाख ८६ हजार, दापोलीतील चार जणांकडून १६ हजार, गुहागरातील २९ लोकांकडून १ लाख २२ हजार रुपये वसूल केले जाणार आहेत.

याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना केल्या असून सर्व तहसीलदारांनी अपात्र लाभार्थ्यांना नोटिसा काढल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2020 12:16 am

Web Title: five thousand beneficiaries of kisan sanman yojana in ratnagiri district are ineligible abn 97
Next Stories
1 पश्चिम विदर्भात सोयाबीन, कापसाचे अर्थकारण बिघडले
2 भातशेती नुकसानग्रस्तांना साडेनऊ कोटींची भरपाई
3 दाऊदच्या बंगल्याचा फक्त ११ लाख ३० हजार रूपयांमध्ये लिलाव
Just Now!
X