29 January 2020

News Flash

पूरग्रस्तांसाठी पुण्यातील मूर्तीकारांचा पुढाकार, बाप्पाच्या पाच हजार मूर्ती पाठविणार

सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी तब्बल 5 हजार बाप्पाच्या मूर्ती मोफत पाठविण्याचा निर्णय

सांगली आणि कोल्हापूर येथील पुरामुळे या भागातील हजारो घरांचे नुकसान झाले आहे. यामुळे जेवढे होते नव्हते ते सर्व पाण्यात वाहून गेले आहे. या पुराची भीषणता लक्षात घेता राज्यातील अनेक भागातून पूरग्रस्त नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ सुरू झाला आहे. यातून तेथील अनेक कुटुंब सावरत आहेत. पण, आता येणारे सण कसे साजरे करणार असा प्रश्न देखील त्यांच्या मनात निश्चित उभा राहिला आहे. या त्यांच्या भावना लक्षात घेता पुण्यातील गणपती बाप्पाच्या मूर्ती तयार करणारे मूर्तीकार पुढे आले असून सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी तब्बल 5 हजार बापाच्या मूर्ती मोफत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर पुण्यातील मूर्तीकार गणेश दशरथ लांजेकर म्हणाले की, “गणपती बाप्पाची मूर्ती तयार करणारी आमची तिसरी पिढी आहे. या तिन्ही पिढ्यांनी बाप्पाची मनोभावे सेवा केली आहे. या दरम्यान आम्ही अनेक घटनांचा सामना करीत सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. यंदा कोल्हापूर आणि सांगली भागात हजारो घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे तेथील कुटुंबांना पुन्हा नव्याने त्याच ताकदीने उभं राहण्यास काही काळ जाणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन आठवड्याभरावर आले आहे. यामुळे सर्वत्र त्याच्या आगमनाची जय्यत तयारी करताना दिसत आहे. पण, आपलेच कोल्हापूर आणि सांगली येथील बांधव हा सण कसा साजरा करणार असा विचार आमच्या सर्वांच्या मनात आला. त्यानंतर आमच्या क्षेत्रातील काही मंडळी एकत्रित येत तेथील नागरिकांना बाप्पाची मूर्ती देण्याचा निर्णय घेतला आहे. या कार्याला सर्वांनी पाठिंबा दिला असून 30 तारखेला सांगली आणि कोल्हापूरच्या दिशेने 5 हजार बाप्पाच्या मूर्ती घेऊन जाणारे ट्रक रवाना होणार आहेत. तसेच तेथील तहसीलदारांच्या हस्ते बाप्पाच्या मूर्तीचे वाटप नागरिकांना केले जाणार आहे. यामुळे या सर्वांना एवढ्या मोठ्या संकटातून पुन्हा बाप्पा उभा राहण्याची ताकद देईल. या भावनेतून आम्ही हा उपक्रम करित आहोत. ज्या मूर्ती विक्रेत्यांना किंवा नागरिकांना या उपक्रमात सहभागी व्हायचे असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा”, असं ते म्हणाले. तसेच मदत म्हणून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत स्वीकारली जाणार नाही, तर मूर्ती द्यावी किंवा वाहनाची व्यवस्था करण्यास मदत करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.

First Published on August 25, 2019 2:16 pm

Web Title: five thousand lord ganesha idol will be distributed in flood affected kolhapur and sangli sas 89
Next Stories
1 …तोपर्यंत फेटा बांधणार नाही, खासदार अमोल कोल्हेंचा निर्धार
2 जळगावमध्ये मनसेच्या माजी पदाधिकाऱ्याची हत्या
3 प्रस्तावित तेल रिफायनरी क्षेत्रात जमीन घोटाळा
Just Now!
X