बिगबॉस फेम अभिजित बिचुकले यांनी त्यांच्यावरील खंडणी मागण्याचा आरोप आज (बुधवार) फेटाळला. सातारा न्यायालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कळंबा कारागृहात बिचुकलेंची आरोप निश्चिती करण्यात आली. न्यायाधिशांनी बिचुकलेंना खंडणीच्या आरोपाबाबत विचारले असता त्यांनी गुन्हा कबूल नसल्याचे म्हटले.
धनादेश न वठल्याप्रकरणात जामीन मिळाल्यानंतर बिचुकलेंना पोलिसांनी २०१२ मध्ये दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक केली. त्यात त्यांना शनिवारी न्यायालयीन कोठडी मिळाली. सोमवारी या प्रकरणात त्यांच्या वतीने जामीन मिळण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज करण्यात आला. त्याची गुरुवार ( दि २७) रोजी सुनावणी आहे.
दरम्यान मंगळवारी त्यांचे वकील अॅड. शिवराज धनवडे यांनी खंडणीच्या गुन्ह्यातील खटल्यात आरोप निश्चिती करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यास न्यायालयाने संमती दिली होती. त्यानुसार आज (बुधवार) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कळंबा कारागृहात बिचुकलेंची आरोप निश्चिती झाली. यावेळी बिचुकलेंनी गुन्हा कबुल नसल्याचे न्यायाधिशांना सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 26, 2019 9:38 pm