मराठवाडा विभागातील अपुऱ्या पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन खंबीरपणे उभे आहे. सर्वानी राजकीय मतभेद विसरून शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या कामात सहभाग नोंदवला पाहिजे, असे पालकमंत्री रामदास कदम यांनी  सांगितले.
स्वातंत्र्यदिनाच्या ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, अपुऱ्या पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. शासन त्याच्या पाठीशी उभे आहे. अशा प्रसंगी राजकीय मतभेद बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या मदतीला धावले पाहिजे, अशी शासनाची भूमिका आहे. शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने विविध निर्णय घेतले आहेत. राज्यात १ लाख विहिरी खोदण्याचा, ५० हजार शेततळी उभारण्याचा राज्य सरकारचा निर्धार असून मराठवाडा विभागातील र्सव जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने गहू आणि तांदूळ पुरविला जाणार आहे.
यावेळी पालकमंत्री कदम यांच्या हस्ते सहायक पोलीस निरीक्षक माधव गायकवाड यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले. तसेच अजहर जब्बार खान पठाण आणि अश्विनी मधुकर महिरे यांना जिल्हा क्रीडा कार्यालयाचा जिल्हा युवक व युवती पुरस्कार प्रदान करण्यात आला. वेलकम शैक्षणिक सामाजिक संस्थेला जिल्हा युवा संस्था पुरस्कार देण्यात आला.
प्राथमिक तसेच माध्यमिक शिष्यवृत्ती आणि राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थी आणि विद्याíथनींचा यावेळी गौरव करण्यात आला. त्यात शालिनी कीर्तिकर, साक्षी सोनवणे, सोनाली सुसुंद्रे, अजहर शेख, पार्थ भोरे, प्रतोष पाटणकर, वरुण पाटील, आकाश झंवर, वैभव बजाज, सुशांत राठी यांचा समावेश होता.
या कार्यक्रमाला विविध स्वातंत्र्यसनिक तसेच खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन, आमदार संजय शिरसाट, अतुल सावे, इम्तियाज जलील, महापौर त्र्यंबक तुपे आदींची उपस्थिती होती.