जगात सर्वाधिक भाविकांचा सहभाग असणाऱ्या धार्मिक महोत्सवांपैकी एक असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे मंगळवारी पहाटे सहा वाजून १६ मिनिटांनी नाशिक येथे तर, त्र्यंबकेश्वर येथे सहा वाजून १५ मिनिटांनी ध्वजारोहण होणार आहे. नाशिक येथे केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक तर, त्र्यंबकेश्वर येथे पंच दशनाम आखाडा परिषदेचे अध्यक्ष अवधेशानंद महाराज यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. दोन्ही ठिकाणी ध्वजारोहणाच्या पाश्र्वभूमीवर १३ जुलै रोजी ध्वजाची शोभायात्रा काढली जाणार आहे.
देश-विदेशातील साधू, महंत आणि भाविकांचे लक्ष वेधलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यास मंगळवारपासून सुरूवात होत आहे. नाशिक येथे रामतीर्थावर पहाटे साडेचारपासून पूजेला सुरूवात होईल.
असा आहे धर्मध्वज
नाशिक येथे ध्वजारोहण होणाऱ्या धर्मध्वजाची रूंदी १५ फुट तर, उंची साडेचार फुट आहे. ध्वजाच्या एका बाजूला बृहस्पतीचे वाहन सिंहाचे चित्र असून दुसऱ्या बाजूला श्री, मध्यभागी कुंभ आणि शेजारी ओम आहे. ध्वजस्तंभाची उंची ४० फुट आहे. दुसरा ध्वज गंगा गोदावरी माता मंदीरावर फडकविण्यात येईल.