एजाजहुसेन मुजावर

सोलापूर जिल्ह्य़ासाठी वरदान ठरलेल्या उजनी जलाशयावर यंदा हिवाळी पाहुणे पक्ष्यांनी विस्तारासाठी प्रचंड गर्दी केली होती. तीन-चार महिन्यांच्या वास्तव्यानंतर हे लाखमोलाचे पाहुणे सामान्यपणे मे महिन्यात आपल्या मूळस्थानी परतीच्या मार्गाला लागतात. परंतु यंदा थंडी पडण्याअगोदरच हजारोंच्या संख्येने येऊन दाखल झालेले फ्लेमिंगो पक्षी अद्यापि उजनी जलाशयावर मुक्कामाला आहेत.

युरोप व कच्छच्या रणातून हे नजाकतदार फ्लेमिंगो पक्षी हिवाळ्यात सोलापूर जिल्ह्य़ातील उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रासह सोलापूर शहरालगतच्या हिप्परगा तलाव, अक्कलकोट तालुक्यातील कुरमनूर धरण परिसर, मोहोळ तालुक्यातील आष्टी तलावात येऊन दाखल झाले होते. या वर्षी पुरेसे पर्जन्यमान झाले नसल्यामुळे उजनी जलाशय वगळता जिल्ह्य़ातील सर्वच जलस्थाने फेब्रुवारी महिन्यातच कोरडीठाक झाली आहेत. जिल्ह्य़ात विखुरलेले फ्लेिमगो पक्षी मार्च-एप्रिल महिन्यात उजनी जलाशयावर एकवटले आहेत. अद्यापि त्यांचा वावर उजनी पाणलोट क्षेत्रात कायम असल्याचे दिसून येते. याबाबतचे निरीक्षण अकलूजचे पक्षीतज्ज्ञ डॉ. अरविंद कुंभार यांनी नोंदविले आहे. त्यांच्या निरीक्षणानुसार सध्या आढळणाऱ्या फ्लेमिंगोंच्या समूहात त्यांच्या पिलांची संख्या लक्षणीय आहे.

फ्लेमिंगो पक्ष्यांतील ‘लेसर’ फ्लेमिंगो या प्रकारचे पक्षी उजनी जलाशयावर येणे तसे दुर्मीळच. मात्र यंदा प्रथमच हे नवे पाहुणे देखील शेकडोंच्या संख्येने फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवडय़ात दहा-पंधरा दिवसांच्या मुक्कामासाठी येऊन गेले, ही विशेष बाबही डॉ. कुंभार यांनी नमूद केली.  जलाशयातील पाण्याचे बाष्पीभवन व अमाप पाणी उपशामुळे सध्या उजनी धरणातील पाणी उणे ५५ टक्क्य़ांपर्यंत खाली पोहोचले आहे. धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील भूभाग उघडा पडला आहे. या ठिकाणी महिनाभर चाळिशी पार केलेल्या तापमानाच्या पाऱ्यात पक्ष्यांना मात्र आल्हाददायक वातावरण दिसून येते.

पळसदेव परिसरात फ्लेमिंगो

हिवाळ्यात सोलापूर जिल्ह्य़ात स्थलांतर करून आलेल्या फ्लेमिंगो पक्ष्यांसह इतर बदके सामान्यपणे एप्रिल महिन्यात आपल्या मूळस्थानी परतीच्या प्रवासाला जातात. मात्र यंदाच्या वर्षी फ्लेमिंगो पक्षी अद्यापि उजनी जलाशयावर मुक्कामाला आहेत. पावसाला प्रारंभ झाला की म्हणजे आगामी आठवडय़ात हे पक्षी देखील उड्डाण करून परतीच्या प्रवासाला जातील. पळसदेव परिसरात सध्या फ्लेमिंगोंचा वावर पाहावयास मिळतो. पाण्यातून मुक्त झालेले पळसदेव मंदिर पाहावयाला येणाऱ्या पर्यटकांना हे फ्लेमिंगो पक्षी देखील आकर्षित करीत आहेत.

-डॉ. अरविंद कुंभार, पक्षितज्ज्ञ