प्रतिकूल हवामानामुळे शहीद गुजर यांचे पार्थिव मंडणगडमध्ये आणण्यात अडचणी

अरूणाचल प्रदेशमध्ये बचावकार्य करत असताना हेलिकॉप्टर दुर्घटनेत बेपत्ता झालेले वायुदलाचे फ्लाईट इंजिनियर सार्जंट राजेंद्र यशवंत गुजर (वय २९) यांचा मृतदेह शनिवारी सापडला आहे. मात्र प्रतिकूल हवामानामुळे त्यांचे पार्थिव हेलिकॉप्टरने रत्नागिरी जिल्ह्यातील पालवणी-जांभूळनगर येथे आणण्यात आज अडचणी आल्या. त्यांचे पार्थिव संध्याकाळपर्यंत अरूणाचल प्रदेशमध्येच असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

अरूणाचल प्रदेशमधील पापमपेर जिह्यात बचावकार्यात सहभागी झालेल्या वायुदलाच्या हेलीकॉप्टर अपघातात रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यामधील पालवणी-जांभुळनगरचे रहिवासी फ्लाईट इंजिनियर सार्जंट राजेंद्र यशवंत गुजर (२९) हे बेपत्ता झाले होते. अरूणाचल प्रदेशात सगाली परिसरात अतिवृष्टी व भूस्खलनामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला होता. एलएच ुव’ या हेलीकॉप्टरमधून गुजर यांच्यासह चार जणांच्या बचाव पथकाने एक ते चार जुलपर्यंत १६९ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले होते. मात्र मंगळवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास या हेलीकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच त्यांचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. यावेळी हे हेलिकॉप्टर युमिसामदोंग या मोठमोठे डोंगरकडे असलेल्या जंगलाच्या परिसरात १५ हजार फूट उंचीवरून उडत होते. यावेळी फ्लाईट लेफ्टनंट थइंजिनियर सरजट राजेंद्र गुजर यांच्यासह विंग कमांडर एम. एस. धिल्लाँ, फ्लाईट लेफ्टनंट पी. के. सिंग, व आयआरबीचा जवान नाडा उम्बींग असे चौघेजण हेलिकॉप्टरमध्ये होते. त्यानंतर अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या उर्वरित तिघांचा मृतदेह सापडला. चार दिवस अथक शोधकार्य केल्यानंतर गुजर यांचा मृतदेह शनिवारी सापडला.

शहीद वायुसनिक गुजर यांचे पार्थिव हेलिकॉप्टरने आसाममधून दापोली येथे सकाळी साडे अकराच्या सुमारास आणण्यात येणार होते. तेथून त्यांच्या मूळगावी मंडणगडमधील जांभूळनगर येथे अंत्यसंस्कारासाठी नेले जाणार होते. पण प्रतिकूल हवामानामुळे या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द करण्यात आले असून ते आता मुंबईमाग्रे रस्त्याने मंडणगडात आणले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळवण्यात आले. मात्र सांयकाळपर्यंत त्यांचे पार्थिव अरूणाचल प्रदेशमध्येच असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. उद्या सकाळपर्यंत त्यांचे पार्थिव जांभूळनगर येथे आणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

गुजर यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण पालवणीच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये घेतले होते. यानंतर मंडणगड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात विज्ञान शाखेतून बारावी पूर्ण केले होते. त्यानंतर महाविद्यालयात पुढील शिक्षण घेत असतानाच त्यांना हवाई दलात जाण्याची संधी मिळाली. तेथून ते विविध परीक्षा देत फ्लाईट लेफ्टनंट थइंजिनियर सरजट पदापर्यंत पोचले होते. त्यांचे वडील यशवंत गुजर हे निवृत्त मेजर असून मोठा भाऊ शाम गुजर हेदेखील सध्या भारतीय सन्य दलात कार्यरत आहेत.