जिल्ह्य़ात सुरु असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणूक वादातून कायदा व सुव्यवस्थेत बाधा आणणाऱ्या घटना घडू लागल्या आहेत. अशाच एका घटनेतून नगर शहराजवळ, निंबळक (ता. नगर) गावातील दोन गटांत शुक्रवारी रात्री धुमश्चक्की उडाली. दोन्ही गटांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारातच हाणामारी करत परस्परांवर दगडफेक केली. त्यात दोन पोलीस जखमी झाले. धुमश्चक्रीतील एक गट राष्ट्रवादीचा तर दुसरा शिवसेनेचा आहे.
पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या १९ जणांना अटक केली. या चकमकीत एमआयडीसी पोलीस ठाण्याचे शिपाई प्रवीण खंडागळे व विठ्ठल मणीकेरी हे दोघे जखमी झाले.
दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत, तसेच कारच्या नुकसानीची व पोलीस ठाण्याच्या आवारात परस्परांवर दगडफेक केल्याचे चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी सायंकाळी विलास लामखडे व अतुल दिवटे यांच्यात गावातील बाणेश्वर चौकात वाद झाले. त्यातूनच दोन्ही गटांत मारामारी सुरु झाली.
रात्री साडेनऊच्या सुमारास पुन्हा वाद झाले. हाणामारीचे रूपांतर पोलीस ठाण्यातील आवारातच परस्परांवर दगडफेक करण्यात झाले. दोन्ही गटांना आवरण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. रात्री ११ पर्यंत पोलीस ठाण्यात गोंधळ उडाला होता. याच दरम्यान एमआयडीसीतील एल ब्लॉकमध्ये हॉटेल गणेशसमोर कोंडिबा गायकवाड यांच्या मारुती स्विफ्ट गाडीची लामखडे गटाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. आता परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.