जहाजांच्या तळाची दुरुस्ती करण्यासाठी आवश्यक तरंगत्या सुक्या गोदीचे (फ्लोटिंग ड्राय डॉक) तालुक्यातील काताळे बंदरात बुधवारी यशस्वीपणे जलावतरण करण्यात आले. अशा प्रकारच्या गोदीची सुविधा असलेला हा देशातील पहिलाच प्रकल्प आहे.
येथील मरिन सिंडिकेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने जयगड खाडीतील काताळे बंदरात हा प्रकल्प साकार केला असून, या गोदीची लांबी ८० मीटर, रुंदी २४ मीटर तर उंची ९.२ मीटर आहे. या संदर्भात माहिती देताना मरिन सिंडिकेटचे संचालक कॅप्टन दिलीप भाटकर यांनी सांगितले की, समुद्रात फिरणाऱ्या सर्व प्रकारच्या जहाजांच्या पाण्याखालील तळाची दुरूस्ती करण्यासाठी सुक्या गोदीची गरज असते. ही जहाजे या गोदीमध्ये घेऊन, पाण्याबाहेर संपूर्ण वर उचलून त्यांची दुरुस्ती केली जाते. मुंबई बंदरात अशा प्रकारच्या दुरूस्ती कामासाठी ब्रिटिशकालीन गोदी आहे. पण स्वातंत्र्यानंतर देशात उभारण्यात आलेला हा पहिलाच प्रकल्प आहे. लांजा तालुक्यातील शिपोशी येथील दिलीप बाईंग यांचाही या उभारणीमध्ये सहभाग आहे. भारतीय जहाजांच्या दर्जेदार बांधणीसाठी नियमन करणाऱ्या इंडियन रजिस्ट्रार ऑफ शिपिंगने (आयआरएस) घालून दिलेल्या नियमावलीनुसार या गोदीचे बांधकाम केले असल्याचे नमूद करून कॅप्टन भाटकर म्हणाले की, गोव्याचे नेव्हल आर्किटेक्ट राजेश बेळगावकर यांच्या ‘आर्चेटाइप’ या कंपनीने प्रकल्पाचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार खास रासायनिक प्रक्रिया आणि भौतिक गुणधर्म असलेल्या पोलादाचा वापर करून सर्व बांधणी किनाऱ्यावर पूर्ण झाल्यानंतर आयआरएसतर्फे त्याचे सर्वेक्षण केल्यानंतर जलावतरण करण्यात आले.

मुलींचा मोलाचा वाटा
आगामी दोन महिन्यांत जयगड खाडीत विशिष्ट जागी १० मीटर खोल पाण्यात ही गोदी स्थिर करून प्रत्यक्ष जहाज दुरुस्तीची कामे सुरू होतील. १२५० टन वजनाच्या या गोदीवर १८०० टन वजनापर्यंतची जहाजे उचलून दुरुस्ती करणे शक्य होणार आहे. रत्नागिरी आणि गुहागर तालुक्यातील स्थानिक तंत्रज्ञ, वेल्डर, फिटर यांच्यासह कंपनीतील तंत्रशिक्षण घेतलेल्या मुलींचाही या प्रकल्पाच्या उभारणीमध्ये मोलाचा वाटा असल्याचे कॅप्टन भाटकर यांनी आवर्जून नमूद केले.