07 December 2019

News Flash

१.२२ लाख कुटुंबे अजूनही अंधारात

३८०७ रोहित्रांचा व दोन लाख ७३ हजार ८१७ वीजग्राहकांचा वीजपुरवठा आतापर्यंत सुरू केला आहे.

२.७२ लाख पूरग्रस्त घरांचा वीजपुरवठा पूर्ववत

मुंबई : सांगली व कोल्हापूर जिल्ह्य़ात तसेच कोकणात महापुरामुळे खंडित झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणने प्रभावी व नियोजनबद्ध अंमलबजावणी केल्यामुळे दोन लाख ७२ हजार पूरग्रस्त ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला असून या महापुरामुळे राज्यभरात महावितरणचे ५२३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी दिली. उर्वरित भागातील वीजपुरवठाही उद्यापर्यंत सुरळीत होईल, असा दावाही त्यांनी केला.

अतिवृष्टी आणि महापुरामुळे महावितरणला मोठा फटका बसला आहे. मात्र कंपनीने नियोजनबद्धरीत्या कोल्हापुरातील २८८४ व सांगलीतील ९२३ अशा एकूण ३८०७ रोहित्रांचा व दोन लाख ७३ हजार ८१७ वीजग्राहकांचा वीजपुरवठा आतापर्यंत सुरू केला आहे. स्वातंत्र्य दिनापर्यंत शेतीपंप वगळता पूर ओसरलेल्या भागातील वीजपुरवठा सुरू करण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी कोल्हापूर- सांगलीत महावितरणचे चार हजार कर्मचारी तसेच दीड हजार कंत्राटी व शेजारच्या जिल्ह्य़ांतून आलेल्या ४० पथकांतील ५०० हून अधिक कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. कोल्हापूरमध्ये अजूनही ५२ हजार तर सांगलीत ७० हजार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा बंद असून पाणी कमी झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने हा वीजपुरवठा पूर्ववत केला जात आहे. सद्य:स्थितीत कोल्हापूर मंडलामध्ये गांधीनगर व आवाडे मळा अशी दोन उपकेंद्रे व सांगली मंडलामध्ये शेरीनाला, बालाजी मंदिर, दुधगाव, कवठेपिराण, पनुद्रे व बह्मनाळ अशी आठ उपकेंद्रे बंद आहेत. सातारा जिल्ह्य़ातही अजून ४४२ पूरग्रस्तांच्या घरांत अंधार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.

ज्या ठिकाणी पर्यायी व्यवस्थेद्वारे वीजपुरवठा देणे शक्य आहे व जी उपकेंद्रे सुस्थितीत होती तेथून वीजपुरवठा वळवून सुरू करण्यात आला तसेच पुनर्वसन केंद्रानांही वीजपुरवठा देण्यात आला आहे. तसेच ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी जनरेटर्सची  व्यवस्था करून ग्राहकांना वीजपुरवठा देण्यात येत आहे.

पाणीपुरवठा योजना, प्राथमिक आरोग्य केंद्र, बस स्थानक, अग्निशमन दल व घरगुती ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात येत असून उद्यापर्यंत हे काम मार्गी लागेल, असेही त्यांनी सांगितले.

First Published on August 15, 2019 4:51 am

Web Title: flood affected 1 lakh 22 thousand families are still living in dark zws 70
Just Now!
X