सांगली : पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व वाढीव मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाची पाहणी करत पूरग्रस्तांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी हरिपूर येथे ही मागणी केली आहे.

सांगली जिल्ह्याताल्या पूरग्रस्त भागाची आज शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. अंकली ,हरिपूर, सांगलीसह  जिल्ह्यात पूराचा फटका बसलेल्या  भागात जाऊन आदित्य ठाकरे यांनी स्थितीचा आढावा घेतला. हरिपूर येथे आदित्य ठाकरे यांनी हळदीच्या पेवांची व नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. हरिपूर मधील पूरग्रस्तांशी संवाद साधताना ते म्हणाले, शेतीबरोबरच सामान्य जनतेचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे. त्याचबरोबर पूरग्रस्तांना वाढीव मदतही मिळाली पाहिजे. आपण मुख्यमंत्र्यांकडे याबाबत मागणी करणार आहोत. तसेच पूरग्रस्तांनी आपल्या आरोग्याची सर्वप्रथम काळजी घेतली पाहिजे, कोणतीही लक्षणे असल्यास तातडीने त्यांच्या भागातील आरोग्य केंद्रात जाऊन औषधोपचार घ्यावेत.  पूरग्रस्तांना जर मदत मिळत नसेल, तर त्यांनी शिवसेनेच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी. शिवसेनेच्या माध्यमातून ती मदत पोहोचवली जाईल असेही त्यांनी या वेळी सांगितले.

पूरग्रस्त व्यापाऱ्यांना एक वर्षांसाठी जीएसटी मध्ये सूट आणि विविध करमाफीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली असून लवकरच ती मान्य होईल, असे आश्वासन  ठाकरे यांनी दिले. तसेच सरकारकडून जाहीर झालेल्या मदतीच्या अंमलबजावणीसाठी आपण स्वत प्रयत्नशील राहू असे आश्वासनही  व्यापाऱ्यांना दिले.

कृष्णा नदीच्या महापुराने सांगली शहरातील बाजारपेठ उद्ध्वस्त झाली आहे. सांगलीच्या बाजारपेठेचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी व्यापाऱ्यांशी संवाद साधत ठाकरे यांनी व्यापाऱ्यांच्या मागण्या आणि अडचणी जाणून घेत, एक वर्ष जीएसटी मध्ये सवलत, तसेच विविध कर माफी देण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे असे सांगितले. विमा कंपन्यांच्याकडून तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी सूचना केल्या आहेत. त्यामुळे सरकारकडून व्यापाऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी आपण स्वत प्रयत्नशील राहू, असे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी या वेळी व्यापाऱ्यांना दिले.